पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:38 PM2017-10-19T16:38:08+5:302017-10-19T16:42:22+5:30
लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.
लांजा , दि. १९ : तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने जलस्वराज्य योजनेचा वाडीमध्ये असणारा मीटरच बंद केल्याने ग्रामस्थांना जलस्वराज्याच्या पाण्यापासून मुकावे लागले आहे. या बाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
देवधे ग्रामपंचायतीच्यावतीने गावात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीयोजना सुरू आहे. मात्र गावातील वरची सावंतवाडी येथे दोन ते अडीच महीने झाले तरी पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागले आहे. ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीने पाणी बंद केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
देवधे वरची सावंतवाडी येथील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी न भरल्याने ग्रामपंचायतीने येथील पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र यावर कोणताही तोडगा न काढता एकाएकी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायती विरोधात चिड निर्माण झाली आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने या वाडीचे महावितरण कंपनीचे पाण्याचे वीजबिलही भरलेले नाही. ते न भरल्याने महावितरणने वरची सावंतवाडी येथील पाण्याचा मिटरच बंद केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे.
पाण्यासाठी सार्वजनिक वाडीमध्ये एकच विहीर असून तीही दूरवर असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाकडे ग्रामपंचायतीनेही दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली तर काहींनी भरली नसल्याने महावितरणने मिटर बंद केला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाण्याच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.