पावसामुळे भाज्यांची आवक घटली, दर ‘जैसे- थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:46+5:302021-06-21T04:21:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात होणारी भाजीपाला आवक घटली आहे. भाज्यांचे दर अद्याप ‘जैसे थे’ आहेत. खाद्यतेलाच्या दरात किंचित घसरण झाली असून, दर आणखी खाली यावेत अशी अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात भाज्या लगतच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येतात. फळे मात्र वाशी (नवी मुंबई), कोल्हापूर येथून येतात. भाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलोच्या घरात असून, कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा विक्री २२ ते २५ रुपये किलो दराने सुरू आहे. बाजारात सर्व प्रकारची फळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनलाॅक सुरू झाले असले तरी गावोगावी भाजी विक्रेते वाहनातून भाजी विक्रीसाठी फिरत आहेत. त्यामुळे भाज्यांची उपलब्धता ग्रामीण भागात होत असून, दरात मात्र घसरण न झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. पालेभाज्या, कोथिंबीर जुडी अद्याप १५ ते २० रुपये, तर टोमॅटो २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.
बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. फोडशी, टाकळा, भारंगी, तसेच शेवग्याचा पाला, फणसाचे गरे, सुरण, आठला विक्रीसाठी येत आहेत. ग्रामीण भागातून मोजकेच विक्रेते भाज्या विक्रीसाठी शहरात आणत असल्याने हातोहात भाज्या संपत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.
अननस मुबलक स्वरूपात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. गावठी, तसेच बाजारी अननस विक्रीला येत असून, ३५ ते ४० रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. गावठी अननससाठी विशेष पसंती होत आहे.
कांदा दर अद्याप ‘जैसे थे’च आहे. बटाट्याचेही दर घटलेले नाहीत. कांदा २५ ते ३० ते बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लसूण विक्री
१५० ते १६० रुपये दराने सुरू आहे. दर परवडत नसल्याने ग्राहक लागतील तेवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत
अनलाॅकमुळे भाज्या विक्रेते गावोगावी येत असले तरी भाज्यांच्या दरावर मात्र काहीच फरक झालेला नाही. किमान कांदा, बटाटा, लसणाचे दर तरी खाली येणे आवश्यक होते. दरावर निर्बंध नसल्यामुळे वाढ सातत्याने होत आहे. इंधन दरातील वाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याने याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.
-उज्ज्वला शिंदे, गृहिणी
गेल्या वर्षभरानंतर खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली. वास्तविक तेलाचे दर अजून खाली येणे अपेक्षित आहे. कोराेनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे असून, त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे.
- शमिका देवरूखकर, गृहिणी