पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर माती आल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 03:39 PM2019-04-30T15:39:13+5:302019-04-30T15:42:44+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
गेले काही दिवस उष्म्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे केव्हाही पाऊस पडण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे पावसाची चिन्हे दिसू लागली होती. त्यातच शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्याने लांजा व राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळणाऱ्या या पावसामुळे हवेत गारवा आला होता. मात्र, या पावसामुळे आंबा बागायतदार चांगले धास्तावले आहेत. तर पाऊस थांबताच पुन्हा उकाड्याने जनता हैराण झाली आहे.
शनिवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्ग चिखलमय झाला आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेली माती रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पावसामुळे ही माती संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचाही वेग कमी झाला होता.
रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने संथगतीने जात आहेत. मातीवरून वाहने घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती मोठ्या प्रमाणात आल्याने याठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.