पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:08 PM2017-12-07T17:08:47+5:302017-12-07T17:18:03+5:30
ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
रत्नागिरी : ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.
पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. पाऊस थांबला तरी ढगाळ हवामान असल्यामुळे कलमांच्या मोहोरावर बुरशीजन्य रोग, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारपासून थंडी गायब असल्याने उष्मा जाणवत होता. रत्नागिरी वगळता जिल्ह्यात सोमवारी अन्य ठिकाणी पाऊस पडला. मात्र, सोमवारी रात्रीपासून रत्नागिरीतही पाऊस सुरू झाला आहे. सरीवर पाऊस कोसळत असला तरी ओलावा वाळण्यापूर्वीच पाऊस पडत आहे. त्यामुळे मोहोर चांगलाच भिजला आहे.
काही ठिकाणी भिजल्यामुळे मोहोर वाकला आहे. पावसाचे पाणी मोहोरात साचल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी फळधारणा झाली आहे. कणी, वाटण्याएवढी फळधारणा झाली असून, पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.
सध्या ६० टक्के पालवी ४० टक्के मोहोर अशी स्थिती आहे. सध्या तुडतुड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे व पावसामुळे बुरशीजन्य रोग व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
हवामानात दरवर्षी होणाऱ्या बदलामुळे आंबापिकावर परिणाम होत आहे. गतवर्षी आंबा एकाच वेळी बाजारात आला. शिवाय त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस बाजारात आल्याने दर कोसळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
यावर्षी सुरूवातीपासूनच पालवीचे प्रमाण अधिक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे थंडी उशिरा सुरू झाली. डिसेंबर सुरू झाला तरी मोहोर प्रक्रिया किरकोळ आहे. याशिवाय हवामानातील बदलामुळे, थंडी गायब असल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फयान वादळानंतर सलग चार - पाच दिवस पाऊस झाला होता. त्यामुळे ओखी वादळ पुढे सरकले असले तरी पाऊस अजून किती दिवस लागेल, याबाबत आताच सांगणे शक्य होणार नाही. मात्र, पावसामुळे आंबापीक धोक्यात आले आहे.
अजून पाऊस सुरूच राहिला तर शेतकरीवर्गाला फार मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस थांबला तरी शेतकऱ्यांना कीड, रोग, बुरशी नष्ट करण्यासाठी उच्चत्तम प्रतीची बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी लागणार आहे.
दरवर्षी हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाली. पालवीचे प्रमाणच सर्वाधिक आहे. परंतु किरकोळ मोहोर प्रक्रिया सुरू झाली. ओखी वादळामुळे वादळी वारे झाले नाहीत, तर पाऊस मात्र बऱ्यापैकी झाला आहे. पावसाचे पाणी मोहोरात गेल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. झालेली फळधारणाही धोक्यात आली आहे. ढगाळ हवामानामुळे बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीड, बुरशीपासून संरक्षणासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहोर संरक्षणासाठी केलेल्या फवारणीचा खर्च मात्र वाया गेला आहे.
- टी. एस. घवाळी, शेतकरी, रत्नागिरी.