शिवसेनेतील गटबाजी ‘सीसीटीव्ही’मुळे उघड
By Admin | Published: July 15, 2017 02:26 PM2017-07-15T14:26:52+5:302017-07-15T14:26:52+5:30
उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची नावेच नाहीत
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी , दि. १५ : जिल्हा शिवसेनेत अंतर्गत मतभेदांची दरी रुंदावत चालल्याची चर्चा जोरात आहे. त्यातच १३ जुलैच्या रत्नागिरीतील सी. सी. टी. व्ही. कॅमेरा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची नावे नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. त्यामुळे जिल्हा शिवसेनेतील गटबाजी सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपने मध्यावधी निवडणुकीची तयारी जिल्ह्यात सुरू केलेली असताना शिवसेनेतील ऐक्याला लागलेला गटबाजीचा भुंगा ठेचणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मूळचे खेड येथील व मुंबईत वास्तव्याला असलेले मंत्री रवींद्र वायकर यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले हे सेनेतील अनेकांना रुचलेले नाही. या पदासाठी सक्षम असलेल्यांना डावलल्याची भावना त्यामुळे काही स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झाली. काहीजण आजही या पदावर डोळा ठेवून आहेत.
या घडामोडीनंतर रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सेनेचे खासदार विनायक राऊत आणि दक्षिण रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असा समविचारी गट सेनेत केव्हा सक्रीय झाला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. पालकमंत्री वायकर रत्नागिरीत आले तरी त्यांच्याबरोबर दक्षिण रत्नागिरीतील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राबता कधीच दिसून आला नाही. हा जणू त्यांच्यावर बहिष्काराचाच प्रकार होता. वायकर यांनीही याची फार दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती बैठक व अन्य काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तरच वायकर रत्नागिरीत येत होते.
रत्नागिरी जिल्हा सी. सी. टी. व्ही. निगराणीच्या कक्षेत आणण्यासाठी जिल्हा पोलीस दल व जिल्हा नियोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने सी. सी. टी. व्ही. प्रकल्पाच्या उद्घाटनाचा सोहळा १३ जुलै रोजी करण्याचे ठरले. त्याचे रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांची नावे असलेली कार्यक्रम पत्रिका प्रसिध्द झाली तेव्हा स्थानिकांना डावल्याचा आक्षेप घेण्यात आला.
आता नव्याने कार्यक्रम पत्रिका छापून हा कार्यक्रम घेण्याचे वायकर यांनी ठरविले आहे. मात्र, यानिमित्ताने सेनेतील गटबाजीचे दर्शन पुन्हा घडल्याची चर्चा आहे.