चिऱ्याच्या टेम्पोमुळे फूट ब्रीज पडला
By Admin | Published: December 31, 2014 09:42 PM2014-12-31T21:42:49+5:302015-01-01T00:18:49+5:30
चिपळुणात खळबळ : दोन दिवसात पुलाच्या कामाला होणार सुरुवात
चिपळूण : शहरातील पाग उघडा मारुती मंदिर ते जोशी आळीला जोडणारा ४० वर्षांपूर्वीचा जुना फूट ब्रीज कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या पुलावरून चिऱ्याचा टेम्पो गेल्याने पूल कोसळला, असे सांगण्यात येत आहे.पाग जोशी आळीतील उघडा मारुती मंदिर ते विरेश्वर देवस्थान परिसराला जोडणारा हा पूल ४० वर्षांपूर्वी माजी नगरसेवक पुरुषोत्तम भागवत यांच्या पुढाकाराने बांधला होता. हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी होता. त्यावरुन लहान वाहने जात होती. अवजड वाहतूक या पुलावरुन फारशी होत नसे. खूप वर्षे झाल्याने पादचारी पुलाची दुरवस्था झाली होती. मंगळवारी दुपारपासून या मार्गावर चिऱ्याची वाहतूक होत होती. दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या फेरीच्यावेळी २०० चिरे घेवून टेम्पो जात असताना चिऱ्याच्या वजनामुळे पुलाचा वरील भाग तुटला व टेम्पोची बॉडी अडकली. यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. कामगारांमार्फत चिरे बाजूला करुन गाडी रिकामी करण्यात आली. रात्री क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आली. या अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, प्रभारी नगराध्यक्ष लियाकत शाह, फैसल पिलपिले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, मंगेश पेढांबकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
या पुलाच्या कामाला पालिकेची मंजुरी मिळाली आहे. परंतु, आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते. दोन दिवसात ठेकेदाराला वर्कआॅर्डर देवून हे काम सुरु केले जाईल असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. पुलाच्या कामास दोन दिवसात सुरूवात होणार असल्याने कालांतराने या परिसरातील वाहतूक पुन्हा सुरू होईल. मात्र अशा प्रकारानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार काय असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)