हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे चित्र अस्पष्टच, आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:54 PM2022-11-28T15:54:36+5:302022-11-28T15:56:02+5:30
कीड रोगापासून संरक्षणासाठी बागायतदारांची धडपड
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे मोहर प्रक्रिया अद्याप मंदावलेली आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अद्यापतरी आंबा पिकाचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. थंडीचे प्रमाण वाढले तर मोहरप्रक्रिया वाढू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्येही मोहर येत असल्याने शेतकऱ्यांना अद्याप आंबा पिकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र, मोहरचे प्रमाण अवघे दहा टक्के असून, ८० टक्के झाडांना पालवी आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पालवी जून होण्यासाठी एक ते दीड महिना बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. थंडी पडू लागल्याने पालवी नसलेल्या झाडांना मोहर सुरू झाला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी गायब आहे. अधूनमधून ढगाळ हवामान असल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायतदारांना बुरशीनाशक, तुडतुडा नियंत्रित, कीडनाशक फवारणी करावी लागत आहे.
तुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्टा साचून काळे डाग राहतात. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते, शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रिप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.
चार, पाच, सहा डझनाची आंबापेटी भरली जाते. मात्र, या पेटीसाठी किमान १५०० ते १७०० रुपये वर्षाला खर्च येतो. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हा खर्च विभागाला जातो. त्यामुळे पेटीला किमान २ हजार रुपये दर मिळाला तर शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये सुटतात.
पेटीचा विभागलेला खर्च
कीटकनाशक : पाचशे ते सातशे रुपये
मजुरी : शंभर ते दोनशे रुपये
राखणी : शंभर ते दीडशे रुपये
खते, साफसफाई : तीनशे ते चारशे रुपये
हवामानातील बदल, बनावट कीटकनाशकाची विक्री, कीटकनाशकाच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर, एकूण महागाईचा परिणाम आंबा उत्पादनाला बसत आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात येईपर्यंतचा खर्च अधिक आहे. तुलनेने पेटीला दर लाभत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हवामानातील बदलामुळे अद्याप आंब्याचे चित्र अस्पष्ट असले तरी मकरसंक्रांतीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कीटकनाशक विक्रीवर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी