नोरू चक्रीवादळामुळे रत्नागिरीत पावसाचा जोर कायम
By मनोज मुळ्ये | Published: October 7, 2022 12:05 PM2022-10-07T12:05:20+5:302022-10-07T12:05:46+5:30
वाऱ्याचा वेग मंदावला, मात्र पावसाचा जोर कायम
रत्नागिरी : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे रत्नागिरीत मुसळधार वृष्टी होत आहे. काल, गुरुवारप्रमाणेच आज शुक्रवारीही सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे.
नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा देशातील २० राज्यांना धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आणि गुरुवार सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.
काल पासून दिवसभर मुसळधार सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच जोर कायम ठेवला आहे. रत्नागिरीसह आसपासच्या तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. दसऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत होते. आता वाऱ्याचा वेग मंदावला आहे. मात्र पावसाचा जोर कमी नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. मात्र अजून कोठेही धोकादायक स्थिती नाही.