मासेमारी घटल्याने मच्छिमारांसह बाजारावरही संकट, मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:50 PM2023-11-25T16:50:50+5:302023-11-25T16:51:35+5:30

मासेमारी व्यवसाय धोक्यात

Due to decline in fishing, the market is also in crisis along with the fishermen | मासेमारी घटल्याने मच्छिमारांसह बाजारावरही संकट, मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली

मासेमारी घटल्याने मच्छिमारांसह बाजारावरही संकट, मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली

रत्नागिरी : सततच्या वातावरणातील बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून, त्यावर अवलंबून असलेली हजारो मच्छीमार कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत.

मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ७,५०० पेक्षा जास्त कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी यंदा पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यात ही उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबीयांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारीपाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरु झाली. मात्र, मासे मिळण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. मासेमारी सुरु झाल्यानंतर अनेकदा वातावरणात झालेल्या बदलामुळे बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरुन ठेवण्यात आल्या. ज्यावेळी वातावरण चांगले होते, त्यावेळी खोल समुद्रात जाऊनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळाले. वातावरणातील बदलामुळेच मत्स्यसाठ्यांवर परिणाम झाला असण्याचीही शक्यता आहे.

मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने ज्या नौका समुद्रात जातात, त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झालेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छिमारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.

डिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती आदीवर दररोज होणारा हजारो रुपये खर्च आणि मासळी विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळेबंदच जुळत नसल्याने मच्छिमारांवर रडण्याची वेळ आली आहे. बँकेचे कर्ज तसेच व्यापाऱ्यांकडून आगाऊ रकमेची परतफेड होत नसल्याने मच्छिमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.


मच्छिमारांचे अनेक प्रश्न आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून बंदरे, खाड्या गाळाने भरलेल्या आहेत. मागणी करुनही त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्याचबरोबर चालू मासेमारी हंगामात चांगल्या प्रतीचे मासे मिळत नाहीत. इतर मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडून कर्जाच्या ओझ्याखाली अडकत चालला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  - इम्रान सोलकर, मच्छिमार नेता, राजिवडा, रत्नागिरी

Web Title: Due to decline in fishing, the market is also in crisis along with the fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.