मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले
By मनोज मुळ्ये | Published: July 8, 2024 11:43 AM2024-07-08T11:43:42+5:302024-07-08T12:06:51+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून ...
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून पडल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. यातील रत्नागिरी आणि रायगडला यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला रेड अलर्ट देत आतखी काही दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असतानाच कोकण रेल्वे मार्गावर वेर्णा ते करमाळी दरम्यान रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळून पडल्यामुळे सोमवारी पहाटेपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने धावणारी नेत्रावती तसेच एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस सुमारे पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला आहे.