गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:51 PM2022-07-08T18:51:15+5:302022-07-08T18:51:38+5:30

वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

Due to siltation the vessels of Vashishti and Shivandi are freed | गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा केल्यानंतर वाशिष्ठी व शिवनदीने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. त्याचे आता काही चांगले परिणाम दिसू लागले असून, तीन दिवसात ४१५ मिलीमीटर इतका पाऊस होऊनही या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

गेली चार महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू होते. सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे वाशिष्ठी नदीत जलसंपदा व यांत्रिकी विभागाने तर शिवनदीत नाम फाऊंडेशनने गाळ उपसा केला. यामध्ये पेठमाप येथील नदीपात्राच्या मधोमध असलेला सुमारे साडेचार एकर क्षेत्राचे बेट काढण्यात आले. वाशिष्ठीच्या दोन्ही पात्रातील गाळ उपसा करण्यात आला. उक्ताड व मिरजोळीतील जुवाड बेटालगतचा गाळही हटविण्यात आला.

बहादूरशेखनाका येथील शेकडो घनमीटर गाळ काढण्यात आला. शिवनदीच्या पात्रातही कापसाळ धरणापासून शिवनदीच्या मुखापर्यंत सुमारे तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ उपसा आला. वाशिष्ठीतील मोठा अडथळा असलेला जुना बाजारपूलही तोडण्यात आला. या सर्वाचा परिपाक म्हणून तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळूनही दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

तीन दिवसातील पावसामुळे वाशिष्ठीतील पाणी पातळी समुद्र सपाटीपासून पाच ते साडेपाच मीटर उंचीपर्यंत वाढली. परंतु धोक्याची पातळी ७ मीटर इतकी असल्याने ही उंची यंदा दोन्ही नद्यांनी गाठलेली नाही. त्यामुळे नद्यांची पाणी वहनक्षमता वाढली असावी, असा निष्कर्ष काढला जात आहे. हा पाऊस तीन दिवसातील असला तरी इतरवेळी त्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती. मात्र यंदा तसा अनुभव अजून आलेला नाही.

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता निश्चितच वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस हा सरासरीप्रमाणे नोंदवला गेलेला आहे. अजूनही सलगपणे अतिवृष्टी झालेली नाही. तसेच सध्याचा कालावधी भांगक्षीचा असल्याने अशावेळी समुद्राला भरतीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. जेव्हा अमावस्येला मोठे उधाण असते व सलगपणे अतिवृष्टी होते, तेव्हाच पुराची किंवा पुरसदृश्यस्थितीची शक्यता असते. - शहानवाज शाह, जलदूत, चिपळूण

Web Title: Due to siltation the vessels of Vashishti and Shivandi are freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.