VidhanSabha Election 2024: दापोलीत महायुतीत वाद, उद्धवसेनेचे चाचपडणे कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:36 PM2024-10-19T12:36:18+5:302024-10-19T12:37:39+5:30
आमदार योगेश कदम यांना भाजपची साथ कितपत मिळेल याबाबत शंकाच
रत्नागिरी : सातत्याने मित्रपक्ष भाजपशी होत असलेल्या वादामुळे दापोलीविधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेला बराच संघर्ष करावा लागणार आहे. त्याचवेळी शिवसेनेतील फुटीचा त्रास महाविकास आघाडीतील उद्धवसेनेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे दापोली मतदारसंघातील निवडणूक कोणालाही सोपी राहिलेली नाही.
दापाेली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये आधीपासूनच वाद आहेत. शिंदेसेना स्वतंत्र झाल्यानंतरही हे वाद मिटलेले नाहीत. उलट लोकसभा निवडणुकीच्या आधी शीतयुद्ध स्वरुपात असलेले हे वाद अधिक उघडपणे आणि आक्रमकपणे पुढे आले आहेत. त्यामुळे महायुतीमधील तणाव वाढला आहे.
शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जवळ करताना भाजपशी सातत्याने पंगा घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना भाजपची साथ कितपत मिळेल, याबाबत शंकाच आहे.
अर्थात योगेश कदम यांनी पाच वर्षात बसवलेला जम पाहता उद्धवसेनेला येथे स्वत:चे पूर्वीचे स्थान निर्माण करणे फारसे सापे राहिलेले नाही.
युती नाते बिघडलेलेच
गेल्या अनेक महिन्यात भाजप आणि शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण दापोली मतदारसंघात परस्पर निधी खर्च करत असल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. त्यानंतर हा वाद वाढला आहे.
उद्धवसेनेचा संघर्ष कायम
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र गत निवडणुकीच्या तुलनेत राजकारणात बरीच उलथापालथ झाली असल्याने उद्धवसेनेचा संघर्ष कायम राहणार आहे.