सोने-चांदी महागले, मॉडर्न आर्टिफिशियल ज्वेलरी भारी
By शोभना कांबळे | Published: May 22, 2024 06:03 PM2024-05-22T18:03:14+5:302024-05-22T18:03:37+5:30
शोभना कांबळे रत्नागिरी : दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडू लागले आहेत. सोन्याला प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह ७७ ...
शोभना कांबळे
रत्नागिरी : दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडू लागले आहेत. सोन्याला प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह ७७ हजार रुपये मोजावे लागत आहे, तर चांदीही आता जीएसटीसह ९५ हजार रुपये प्रति किलो झाली आहे. या दोन्ही धातूंच्या दरांवर आता नियंत्रणच न राहिल्याने या धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होऊ लागली आहे. मात्र, या धातूंचे दर वाढू लागल्याने आता महिला माॅडर्न आर्टिफिशियल ज्वेलरीला तसेच बेंटेक्सच्या दागिन्यांना अधिक प्राधान्य देत आहेत.
अमेरिकेत सोन्यात गुंतवणूक वाढली आहे, तसेच चीननेही सोन्याची खरेदी वाढविली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. पाठोपाठ चांदीच्या दरानेही उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात या दोन्ही धातूंच्या दरात घट होऊ लागली. त्यामुळे हे दर कमी येतील, असे वाटू लागले होते. सोने ७४ हजार ७०० रुपयांवर होते, त्याचा दर ७१ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, महिन्यानंतर ते पुन्हा ७४ हजार ४०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह जवळपास ७७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल आहे. मे महिन्यात चांदीचाही दर वेगाने वाढू लागला आहे.
या दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांना लग्नसमारंभात सोने मिरवणे अवघड झाले आहे. राेजगार करणारे मजूर, कामगार यांना तर आपल्या मुलीसाठी सोन्याचे दागिने करणे म्हणजे स्वप्नवत वाटत आहेत. त्यामुळे २०० ते ४००० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या बेन्टेक्सच्या दागिन्यांवर त्यांचा भर आहे. अगदी श्रीमंत घरातील मुली किंवा महिला माॅडर्न आर्टिफिशियल ज्वेलरीला अधिक प्राधान्य देत आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्सची हौसही होते आणि ती खिशालाही परवडणारी ठरते. त्यामुळे त्याला प्राधान्य दिले जात आहे.
सोन्याची पंच्याहत्तरी; चांदी लाखाकडे
सोन्याचा दर पुन्हा ७५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमकडे जाऊ लागला आहे, तर चांदीही प्रति किलो लाखाच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
..बेंटेक्सला मागणी वाढली
सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे कठीण काम झाले आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, लघु व्यावसायिक व अन्य व्यवसायातील मजुरांच्या महिला व मुली सोन्यासारखेच चकाकणाऱ्या बेन्टेक्सचे दागिने वापरत आहेत. स्वस्त आणि मस्त म्हणूनही या दागिन्यांना पसंती मिळू लागली आहे.
माॅडर्न ज्वेलरी भारी
- लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये मिरविण्यासाठी सोन्याचा एकच दागिना वारंवार घालण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणून आर्टिफिशियल ज्वेलरीला प्राधान्य दिले जात आहे.
- कमी किमतीत; पण सोन्यापेक्षाही अधिक आकर्षक अशी माॅडर्न ज्वेलरी प्रत्येक वेळी बदलता येते. त्यामुळे महिला आणि मुलींमध्ये आर्टिफिशियल दागिन्यांची क्रेझ वाढली आहे.
- अगदी नववधूही स्वागत समारंभात मॅचिंग म्हणून हल्ली माॅडर्न ज्वेलरीला प्राधान्य देतात. महिला घराबाहेर पडू लागल्याने आकर्षक व्यक्तिमत्त्व राखण्यासाठी आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करताना दिसतात.