Vidhan Sabha Election 2024: चिपळूण उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 07:06 PM2024-11-30T19:06:13+5:302024-11-30T19:06:35+5:30
चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या विजयात उद्धवसेनेच्या काही ...
चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या विजयात उद्धवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उघड उघड केलेला विरोधकांचा प्रचार व मतदानाचा परिणाम दिसून आला. या विषयावरून निवडणुकीनंतर येथील उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार निकम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा ६,८६७ मताधिक्याने पराभव केला. मात्र, त्यांनी शरद पवार गटाला सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केल्यामुळे मूळ पक्षात नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपला धडा शिकवण्यासाठी येथील महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्ते पेटून उठले होते. त्यांनी यादव यांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता. परंतु, मतदानाच्या दिवशी याचे उलट चित्र पाहावयास मिळाले. उद्धवसेनेच्या अनेकांनी प्रत्यक्षात उघडपणे निकम यांचा प्रचार केला.
आमदार निकम यांचे सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. यातूनच उद्धवसेनेतील काही कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. त्यातून त्यांनी निकम यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. पक्षातील वरिष्ठांचा विरोध झुगारून निकम यांचा उघड उघड प्रचार केला. त्यामुळे निकम यांचा विजय अधिकच सोपा झाला. निवडणूक निकालानंतर मतांच्या आकडेवारीवरून कोणी कोणी विरोधात काम केले याचा अंदाज घेतला जात आहे. त्याअनुषंगाने संघटनेत अंतर्गत पडसाद उमटू लागले आहेत. चिपळुणात महाविकास आघाडीच्या चिंतन सभेतही उद्धवसेनेचे तालुकाध्यक्ष विनोद झगडे यांनी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले.
पक्षातील वरिष्ठांनी आम्हाला कायम दुय्यम वागणूक दिली. तसेच सतत अपमान केला. त्यांनी कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली. आम्ही पुढील परिणामाची फिकीर न करता शेखर निकम यांचा उघडपणे प्रचार केला. - एम डी. शिंदे, माजी उपतालुका अधिकारी, युवा उद्धवसेना चिपळूण.
महेश शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतही महायुतीचा प्रचार केला होता. ते पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांचे उद्धवसेनेतील युवासेनेचे पद यापूर्वी काढून घेतले आहे. महाविकास आघाडीत ज्यांनी -ज्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे एकमताने ठरले आहे. - विनोद झगडे, तालुकाप्रमुख, उद्धवसेना चिपळूण