मुसळधार पावसामुळे म्हाळुंगेत जमिनीला भेगा, घराला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:51+5:302021-07-17T04:24:51+5:30
राजापूर : तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे म्हाळुंगे - मधलीवाडी येथे जमिनीला सुमारे पाचशे मीटर अंतराच्या भेगा पडल्या आहेत. त्यामध्ये ...
राजापूर : तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे म्हाळुंगे - मधलीवाडी येथे जमिनीला सुमारे पाचशे मीटर अंतराच्या भेगा पडल्या आहेत. त्यामध्ये संतोष माळगवे यांच्या घराला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, घराची इमारत एका बाजूला कलंडली जाऊन धोकादायक बनली आहे. येथील संभाव्य धोका लक्षात घेऊन माळगवे कुटुंबीयांना तातडीने लगतच्या सुरक्षित घरामध्ये स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम राहिला आहे. दिवसभर पाऊस असल्याने माळगवे कुटुंबीय घरामध्ये थांबलेले होते. बुधवारी दुपारी म्हाळुंगे रस्त्यापासून माळगवे यांच्या घराच्या परिसरामध्ये जमिनीला तडे गेले. अचानक घडलेल्या या घटनेने माळगवे कुटुंबीयही सुरूवातीला घाबरले. या घराच्या परिसरामध्ये गतवर्षीही जमिनीला काही प्रमाणात भेगा पडल्या होत्या. मात्र, त्याच्यामुळे कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे माळगवे कुटुंबीय घरामध्येच थांबले होते. मात्र, सायंकाळपर्यंत जमिनीला पडलेली छोटी भेग अधिकच रूंदावत गेली. त्यामध्ये घराच्या भिंतीसह अन्य ठिकाणी मोठे तडे जाऊन सायंकाळी घर एका बाजूला कलंडले जाऊन इमारत धोकादायक बनल्याची माहिती माळगवे यांनी दिली.
सद्यस्थितीमध्ये एका बाजूला कलंडलेली इमारत कधीही खाली कोसळण्याची शक्यता असल्याने बाजूच्या सुरक्षित घरामध्ये तात्पुरते स्थलांतर केल्याचे त्यांनी माळगवे यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन घरासह परिसरातील जमिनीला पडलेल्या भेगांची पाहणी केल्याची माहिती माळगवे यांनी दिली. दरम्यान, माळगवे यांच्या घराच्या परिसरामध्ये जमिनीला भेगा पडलेल्या असताना मधलीवाडीलगत असलेल्या भाबलेवाडीमध्येही काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याची माहिती माळगवे यांनी दिली. दरम्यान, कोतापूर येथील सुरेखा सुरेश आंब्रे यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटनाही घडली आहे.