गुप्तधनासाठी खोदला खड्डा

By admin | Published: January 15, 2017 01:02 AM2017-01-15T01:02:06+5:302017-01-15T01:02:06+5:30

महिलेसह ११जणांना अटक : दाभोळ येथील प्रकार; सर्वजण मुंबईचे

Dug pit for the secret | गुप्तधनासाठी खोदला खड्डा

गुप्तधनासाठी खोदला खड्डा

Next

दाभोळ : जग २१व्या शतकाकडे झेपावत असताना समाजातील अंधश्रद्धा अजूनही मिटलेल्या दिसत नाहीत. दाभोळ येथे बंद घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या अकराजणांविरुद्ध दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. गुप्तधन खोदण्यासाठी दोन वाहने भरुन या मांत्रिकाने मुंबईहून सर्वजणास आणले होते.
दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश तायडे हे सहकाऱ्यांसह मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दाभोळ वरचा विभाग येथे गणपती मंदिराच्या पुढील बाजूस नेहमी बंद असलेल्या घरात वीज दिसली. त्या घरात खोदकामाचा आवाज येत असल्याने तायडे यांनी गाडी थांबवून घराचा दरवाजा वाजविला. दरवाजा उघडल्यानंतर पोलिस आत गेले असता त्यांना माजघरात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. खड्ड्याच्या एका बाजूला माती पडलेली दिसली, तर जवळच एकजण मंत्र उच्चारत होता.
बाजूला हळद पिंजरीने रेषा आखलेल्या व खड्ड्यामध्ये नारळ, लिंबू असे साहित्य दिसून आले. या घरात आठ ते नऊ अज्ञात लोक व एक अनोळखी महिला दिसली. हे सारेजण पोलिसांना बघून लपण्याचा प्रयत्न करू लागल्याने घराच्या मालकाबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यांच्यापैकी दार उघडणाऱ्याने आपले नाव सांगून, हे घर सध्या आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना आणखीन संशय आला. त्यांनी या सर्वांची कसून चौकशी केली.
आपली परिस्थिती खूपच नाजूक असून, ती सुधारण्यासाठी भगताने सांगितल्यानुसार आपण गुप्तधन काढण्याच्या हेतूने हा विधी करत असल्याचे मांत्रिकाने सांगितले. यापैकी दुसऱ्याने मंत्र म्हणणारा माणूस हा गुप्तधन काढून देण्याकरिता जादूटोणा करतो, असे सागितले. या मांत्रिकाने दि. १३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथून दोन वाहने भरून माणसे खड्डा खोदण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत पोलिस पाटील विनायक कुडाळकर यांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्यांना सूचना करून घटनास्थळावर सापडलेले साहित्य हे त्याचठिकाणी ठेवून देण्यास सांगितले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक तायडे यांनी स्वत: फिर्यादी होत पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा कायदा सन २०१३चे कलम ३(१) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंगळवारपर्यंत कोठडी
या सर्व ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बंगाली मांत्रिकाचा समावेश
दाभोळ येथे गुप्तधनासाठी खड्डा खोदण्याचा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकारामध्ये बंगाली मांत्रिकाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dug pit for the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.