लांजाचे डंपिंग ग्राऊंड कोत्रेवाडीतच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:27+5:302021-07-22T04:20:27+5:30
लांजा : लांजातील घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडी येथील जागा निश्चित ...
लांजा : लांजातील घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडी येथील जागा निश्चित करण्याचा ठराव लांजा नगर पंचायतीच्या विशेष सभेत बहुमताने मंजूर झाला. सभागृहातील १७पैकी १६ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने तर भाजपचे गटनेत्यांनी ठरावाच्या विरोधात मत नोंदवले.
या सभेत बहुचर्चित डंम्पिंग ग्राऊंड हा विषय विशेष प्रस्ताव म्हणून चर्चेला आणला गेला. या विषयावर लांजा नगर पंचायत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोत्रेवाडीची ही जागा डम्पिंग ग्राऊंडला घेऊ नये, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. मात्र, ही जागा सर्वच बाजूंनी योग्य असल्याचा निर्वाळा या सभेत देत सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेससह विरोधी गट असलेल्या भाजपच्याही दोन नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
विषय पत्रिकेप्रमाणे या विषयावर चर्चा करताना सुरुवातीलाच नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी या विषयावरचे प्रास्ताविक केले आणि हा विषय मतदानाला आणला. यावेळी भाजपचे गटनेते संजय यादव यांनी या विषयाला जोरदार विरोध करताना सभात्याग केला. परंतु, त्यांचा हा विरोध एकाकी पडला. यानंतर पुन्हा एकदा या विषयावर सविस्तर चर्चा होऊन सभागृहात हा ठराव बहुमताने मंजूर झाला.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सुरुवातीला धुंदरे येथील वादग्रस्त जागेला येथील नागरिकांनी पाण्याचे स्रोत, नदी आणि लोकवस्ती जवळ असल्याने विरोध केला होता. २२ जानेवारी २०२१ला झालेल्या सर्वसाधारण सभेत धुंदरेची ही जागा रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. यानंतर राजापूर - लांजा उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर नोटीस काढून नव्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रस्ताव मागितले. त्यानुसार पाच नवीन प्रस्ताव दाखल झाले. मात्र, तरीही ही प्रक्रिया दीर्घकाळ रखडली होती. या पाच प्रस्तावांपैकी प्रभाग क्रमांक ६ मधील कोत्रेवाडीचा प्रस्ताव सर्व बाजूंनी योग्य ठरल्याने ही जागा निश्चित करण्यासाठी ही विशेष सभा घेण्यात आली. या प्रस्तावाला या प्रभागातील नागरिकांनी विरोध केला होता. परंतु, हा विरोध करण्याची नागरिकांची कारणे ठोस नसल्याने हा विषय मांडण्यात आला.
भाजप गटनेते एकाकी
नगर पंचायतीमधील विरोधी पक्षाचे गटनेते संजय यादव यांनी या विशेष सभेत कोत्रेवाडीतील या जागेला विरोध करताना सभात्याग केला. परंतु, त्यांच्या या भूमिकेला सभागृहातील एकाही नगरसेवकाने पाठिंबा दिला नाही. त्यांच्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनीही संजय यादव यांच्या भूमिकेला समर्थन दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे संजय यादव हे या विषयावर एकाकी पडले.