डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत?

By admin | Published: September 10, 2016 11:54 PM2016-09-10T23:54:07+5:302016-09-11T00:24:24+5:30

दोन आरोग्य केंद्रात जुंपणार : ठोस उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

Dungue das shirasgaat ki bambawadat? | डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत?

डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत?

Next

प्रमोद रावळ--आळसंद  -शिरसगाव (ता. कडेगाव) येथील मंदाकिनी सकटे या विवाहितेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने या कार्यक्षेत्रात असलेल्या मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने जबाबदारी झटकण्याचा उद्योग सुरू केला आहे. ही महिला बांबवडे (ता. पलूस) येथे माहेरी गेल्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचा शोध या आरोग्य केंद्राने लावला आहे. मात्र, या महिलेला माहेरी जाण्यापूर्वीच शिरसगाव येथे ताप आला होता, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या वादामुळे कुंडल व मोहिते वडगाव आरोग्य केंद्रात जुंपण्याची शक्यता आहे.
शिरसगाव येथील महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. वरिष्ठ पातळीवरून चौकशी व सर्व्हेचा आदेश येताच मोहिते वडगाव केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कांबळे व आरोग्य सहाय्यक दिनकर जाधव यांनी मंदाकिनी सकटे गेल्या आठवड्यात बांबवडेला माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे तेथेच त्यांना डेंग्यूची लागण झाली असावी, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
याबाबत संबंधित महिलेचा भाऊ बाळासाहेब सोनावले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंदाकिनी यांना दि. २६ आॅगस्टपासून शिरसगाव येथे असतानाच ताप येत होता. त्यामुळे त्या आजारी होत्या. दि.२९ आॅगस्टला बांबवडे येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊन पुन्हा शिरसगावला गेल्या. दि. २ सप्टेंबरला ताप कमी होत नसल्याने त्यांना पलूस येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मंदाकिनी यांना सांगलीला हलविण्यात आले. त्याठिकाणी डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. मंदाकिनी यांना त्यांच्या गावातच शिरसगावला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असतानाही याबाबत कोणताही आधार नसताना केवळ जबाबदारी झटकली जात आहे.
आता कुंडल व मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विरोधाभास दिसू लागला आहे. दोन्ही आरोग्य केंद्रे डासांबाबत वेगवेगळी विधाने करत आहेत. परंतु, डेंग्यूचे डास शिरसगावात आहेत की बांबवडेत, या वादात पडण्यापेक्षा यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.


सर्वेक्षणाचे आदेश
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी शनिवारी शिरसगाव येथे भेट दिली. त्यावेळी मृत सकटे यांचे नातेवाईक व गावातील ताप आलेले रुग्ण यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याबरोबर गावात सर्व्हे करण्याच्याही सूचना दिल्या. यावेळी डॉ. देशमुख यांनी बांबवडे व शिरसगाव या दोन्ही गावात सर्व्हे करण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला असून, डासांची घनता कमी करण्यासाठी उपाय योजना सुरू केल्याचे सांगितले.

Web Title: Dungue das shirasgaat ki bambawadat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.