काेराेनाकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरच कामाचा बाेजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:11+5:302021-07-07T04:39:11+5:30
टेंभ्ये : लॉकडाऊनमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण संस्था काही काळ पूर्ण बंद तर काही काही काळ उपस्थितीच्या टक्केवारीवर ...
टेंभ्ये : लॉकडाऊनमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण संस्था काही काळ पूर्ण बंद तर काही काही काळ उपस्थितीच्या टक्केवारीवर सुरू करण्यात आल्या. या काळामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रसारावर नियंत्रण घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे निश्चित करण्यात आली. या सर्व कामांसाठी मार्च २० पासून आजपर्यंत केवळ शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच वापरले जात आहेत. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील अन्य आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडच्या नियमांप्रमाणे सवलती आहेत, पण आपत्कालीन काम करण्यासाठी केवळ शिक्षकच नियुक्त केले जात आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचा सूर शिक्षकांमधून उमटत आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अविरतपणे काम करत आहेत. कोविड सेंटर, क्वारंटाइन केंद्र, पोलीसमित्र, तपासणी नाके, आरोग्य केंद्रांमध्ये साहाय्यक इतकेच नाही तर अँटिजन चाचणी करण्यासाठीही साहाय्यक म्हणून शिक्षक काम करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्य विभागांना उपस्थितीचे नियम घालून देण्यात आले. त्या प्रमाणातच संबंधित कर्मचारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहून काम करत होते. या वेळी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण देत होतेच. त्याबरोबरच ते कोविड संदर्भातील सर्व कामकाजही करत होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही शिक्षकांचे पालकत्व स्वीकारण्यापेक्षा त्यांना ड्युटी लावण्यामध्येच जास्त आनंद मिळत असल्याची टीका काही शिक्षकांमधून हाेत आहे. शाळा बंद आहेत म्हणून शिक्षकांना ड्युटी लावली जात असेल तर २५, ५० टक्के उपस्थितीच्या नियमाप्रमाणे अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटी का लावली जात नाही? पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केवळ शिक्षकांनीच ही कामे करणे अपेक्षित आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.
-------------------------
पोस्ट कोविड ट्रीटमेंट सुरू असतानाही ड्युटी !
कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पोस्ट कोविडचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेकांमध्ये लाँग कोविडची लक्षणे दिसत आहेत. याला शिक्षकही अपवाद नाहीत. प्रत्यक्षात मात्र पोस्ट कोविडची ट्रीटमेंट सुरू असतानाही शिक्षकांना कोविड ड्युटी लावली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. शिक्षकांना मात्र ड्युटी लावली जाते.