दिवाळीत रत्नागिरी एसटी विभागाच्या तिजोरीत साडेतीन कोटींचा 'प्रकाश', जादा बससेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:05 PM2023-11-24T12:05:44+5:302023-11-24T12:06:25+5:30
प्रवाशांसाठी सवलती जाहीर केल्याने प्रवाशांची पावले पुन्हा एसटीकडे वळली
रत्नागिरी : दिवाळीनिमित्त ११ ते १५ नाेव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी विभागातून मुंबई, बाेरिवली, पुणे, अक्कलकाेट, लातून मार्गावर जादा बसेस साेडण्यात आल्या हाेत्या. या पाच दिवस रत्नागिरी विभागातून ८ लाख ९५ हजार ६४७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ३ कोटी ५९ लाख १ हजार ९२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सवलती जाहीर केल्याने प्रवाशांची पावले पुन्हा एसटीकडे वळली आहेत. त्यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या मार्गावर साेडलेल्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, हंगामी दरवाढीमुळे महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
महिला सन्मान निधीमुळे उत्पन्नात भर
महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दिवाळीच्या पाच दिवसांत ३ लाख ७० हजार ३८० महिलांनी प्रवास केले. त्यातून ८८ लाख ३६,४१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सवलतीमुळे महिला ग्रुपने देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडू लागल्या आहेत.
अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत
७५ वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ याेजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. दिवाळीत रत्नागिरी विभागात ५९ हजार ३८५ अमृत ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून, त्यातून ४४ लाख ४४ हजार ६१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
६५ वर्षांपुढील प्रवाशांना एसटीतून प्रवास करण्यासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीमुळे रत्नागिरी विभागातील ९ आगारांतून ४४,१८४ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ११ लाख ९ हजार ३२१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे नियमित गाड्यांसह विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले होते. ऑनलाइन आरक्षण सुविधेसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. दिवाळी सणाच्या पाच दिवसांत प्रवाशांनी एसटीतून मोठ्या संख्येने प्रवास केल्यामुळे रत्नागिरी विभागाचे उत्पन्न वाढले आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक
तालुका -प्रवासी - उत्पन्न
मंडणगड - ३८६०५ - २००६५११
दापोली - ११५९६५ - ४८५७६३१
खेड - १११२३३ - ४५९८७८८
चिपळूण - १५५४१७ - ५९०८०१०
गुहागर - ८४४०८ - ३५०९४८४
देवरूख - ९७७२४ - ३३२५१२०
रत्नागिरी - १६३५९७ - ६८९९००४
लांजा - ६७९६२ - २१७१५२०
राजापूर - ६०७३६ - २६२५०२४