वेळेचा सदुपयोग -- लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दिले महिलांना योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:18 PM2020-06-01T13:18:43+5:302020-06-01T13:23:32+5:30
पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार थांबले असतानाच, या कालावधीचा सदुपयोग करीत घरात असलेल्या महिला आणि मुलांसाठी दोन वेळ योगाचे धडे देण्याचा अभिनव प्रयोग रत्नागिरीच्या योगापटू पूर्वा आणि प्राप्ती किनरे भगिनी करीत आहेत. महाराष्ट्र दिनापासून इमारतीच्या टेरेसवर सकाळी आणि सायंकाळी त्यांचे हे योगाचे धडे सुरू आहेत.
पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दोन्ही बहिणींनी अगदी बालवयापासून शिक्षक असलेले वडील शिवराम किनरे यांच्याकडून योगाचे धडे आत्मसात केले. परिश्रम, चिकाटी त्याचबरोबर योगाची प्रचंड आवड असल्याने या दोघींनीही भारतीय योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत रत्नागिरी जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बहुतांशी लोक अजूनही घरातच आहेत. विशेषत: महिला आणि लहान मुले यांना घराबाहेर पडता येत नाही. कोरोनाच्या संकटातून सुरक्षित राहण्यासाठी योगा हे महत्त्वाचे साधन आहे, हे या भगिनींच्या लक्षात आले. आणि घरात राहणाऱ्या महिला आणि मुले यांचे आरोग्य लॉकडाऊनच्या काळातही सुदृढ राहावे, यासाठी त्यांनी त्या राहात असलेल्या इमारतीमधील महिला आणि लहान मुलांना योगाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.
पूर्वा आणि प्राप्ती यांच्या या अभिनव प्रयोगाला त्यांच्या इमारतीमधील नागरिकांकडूनही सदैव प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे त्यांची ही संकल्पना सर्व नागरिकांना पटली आणि आवडलीही. महाराष्ट्र दिनापासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. पूर्वा आणि प्राप्ती सकाळी आणि सायंकाळी ६ ते ७.३० असे दोनवेळा इमारतीमधील महिला आणि मुलांचे योगाचे वर्ग घेत आहेत.
सकाळी प्राणायाम आणि सायंकाळी सूर्यनमस्कार तसेच विविध आसनांचे प्रकार या माध्यमातून महिला व मुलांना शिकायला मिळत आहेत. नियमित प्राणायाम, सूर्यनमस्कार व विविध आसने यामुळे महिला, मुलांचे आरोग्यही चांगले राहात आहे. कोरोना संकट काळात प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. योगाच्या माध्यमातून त्याला हातभार लागत आहे.
आनंदासाठी हास्ययोग
लॉकडाऊनच्या काळात पूर्वा आणि प्राप्ती किनरे या भगिनी आपल्या इमारतीमधील महिला आणि मुलांकडून नियमित सूर्यनमस्कार, ताडासनाचे प्रकार, कटीचक्रासन, सिंहासन, मंडुकासन, उत्तान मंडुकासन, आकर्ण धनुरासन, नाकासन, मेरू दंडासन आदी प्रकार करून घेत आहेत. त्याचबरोबर चित्त आनंदी राहण्यासाठी हास्ययोगही करून घेत आहेत.