रत्नागिरीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच आता धुळीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:46 PM2019-09-28T13:46:30+5:302019-09-28T13:49:19+5:30
रत्नागिरी शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. दुचाकीस्वारांना या धुळीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी : शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. दुचाकीस्वारांना या धुळीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
यावर्षी रत्नागिरीतील मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रारी होऊनही त्याकडे पालिका प्रशासनाकडून पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाऊस सुरु होण्याअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे असताना नगर परिषद प्रशासन मात्र निद्रीस्तच राहिले. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने हे खड्डे अधिकच वाढले. पाऊस सुरू होताच नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविण्याची घोषणा केली. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली. प्रत्यक्षात थातूरमातूर खड्डे बुजविण्याचे काम नगर परिषदेकडून करण्यात आले.
गणेशोत्सवाला दोन-तीन दिवस असतानाच जांभ्या दगडाने काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने या बुजवलेल्या खड्ड्यांतील माती रस्त्यावर येऊन चिखल झाला. त्यातच रस्त्यावर खडीही टाकण्यात आली. मात्र, ही खडीही रस्त्यावर आल्याने रस्ता निसरडा बनला. जिल्हाधिकारी यांनी रस्त्यावर खडी टाकून त्यावर डांबर टाकण्याचे आदेश दिले. मात्र, ते आदेशही धुडकावण्यात आले.
पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर नगर परिषदेतर्फे काही ठिकाणी पुन्हा एकदा जांभ्या दगडांनी खड्डे भरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अधूनमधून या ह्यखड्डे भरणेह्ण कामाचा त्रास वाहतुकीला होतच होता. मात्र, रस्ता काही दुरूस्त झाला नाही. आता या जांभ्या दगडाच्या मातीमुळे तसेच खडीमुळे मोठ्या प्रमाणावर धुरळा निर्माण होत आहे. माळनाका तसेच आरोग्य मंदिर या भागात हा त्रास अधिक होत आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आजारात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.
रत्नागिरी शहराच्या सर्वच भागात रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास असह्य होत असतानाच ते बुजविण्यासाठी केलेली उपाययोजनाही तेवढीच हानिकारक आहे. खड्ड्यात टाकलेल्या माती तसेच खडीमुळे होणाऱ्या धुरळ्याचा त्रास डोळ्यांना इजा करत आहे, त्याचा मीही अनुभव घेत आहे. धुरळ्यामुळे डोळ्याच्या आतील नाजूक भागाला इजा होत असल्याने पाणी येणे, डोळे लाल होणे, सतत खुपणे, डोळे सुजणे, खाज येणे आदी त्रास वाढू लागले आहेत.
- डॉ. विवेक आरभावे,
नेत्रतज्ज्ञ