उपासमारीमुळे तडफडून बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:11 PM2019-09-09T12:11:38+5:302019-09-09T12:12:55+5:30
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास घराशेजारी बिबट्या मृतावस्थेत पडला असल्याचे महेश किंजळकर यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी वनपाल सुरेश उपरे यांना लगेचच ही माहिती दिली. वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या ज्या ठिकाणी मृतावस्थेत सापडला त्या ठिकाणी गवत मळले असल्याचे आढळून आले. यावरून उपासमारीमुळे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या या बिबट्यााचा तडफडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तडफडल्यामुळे बिबट्याची कातडी जमिनीवर घासली जाऊन त्याला जखमाही झाल्या होत्या.
विच्छेदनानंतर ग्रामस्थांसमक्ष बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपाल सुरेश उपरे वनरक्षक शर्वरी कदम आनंद धोत्रे राहुल गुंठे तसेच पोलीस पाटील रमेश तुलसनकर व मिलिंद शिंदे संतोष नागवेकर विजय कुवळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
नखे, मिशा सुस्थितीत
हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे वनविभागाच्या पथकाने सांगितले. त्याची लांबी १५५ सेंमी असून उंची ४६ सेंमी आहे. त्याला १८ नखे असून, नखे व मिश्या सुस्थितीत असल्याची माहिती वनविभागाने दिली. त्यामुळे त्याला कोणी ठार मारले असल्याची शंका पुसली गेली आहे. विच्छेदनानंतर या बिबट्याचा मृत्यू हा उपसमारीमुळे झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.