पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ई - बुक क्लब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:03+5:302021-06-23T04:21:03+5:30
रत्नागिरी : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'राष्ट्रीय वाचन दिनाचे' औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी व ग्रंथालय विभाग ...
रत्नागिरी : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'राष्ट्रीय वाचन दिनाचे' औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी व ग्रंथालय विभाग यांच्या माध्यमातून ई-बुक क्लबची स्थापना करण्यात आली.
सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पोदार स्कूल नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यातून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या हेतूने ई-बुक क्लब ही संकल्पना प्रशालेने राबविली आहे.
या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची तसेच त्यासंबंधीचा अभिप्राय देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक यांनी स्वागत केले आहे. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे प्राचार्य कीर्तीकुमार देशमुख, सर्व समन्वयक, प्रशालेचा ग्रंथालय विभाग व संगणक विभाग यांचे सहकार्य लाभले.