जिल्ह्यातील १२७ शाळांमध्ये ई लर्निंग
By admin | Published: July 17, 2014 11:48 PM2014-07-17T23:48:39+5:302014-07-17T23:54:46+5:30
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन : नावीन्यपूर्ण योजनेत ई-लर्निंगचा महत्त्वपूर्ण उपक्रम
मेहरुन नाकाडे-रत्नागिरी
जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ई लर्निंग प्रकल्प जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. एक कोटी २४ लाखांचा निधी या योजनेंतर्गत मंजूर झाला असून, जिल्ह्यातील १२७ माध्यमिक शाळांमध्ये ई लर्निंगचे सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. ७ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गतवर्षी प्रायोगिकतत्त्वावर दहा शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षी १२७ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. माध्यमिक शाळांना सॉफ्टवेअर खरेदी करुन पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे संगणकाद्वारे विद्यार्थ्यांना फळ्याऐवजी पडद्यावर पाठ्यपुस्तकातील धडा चलतचित्राद्वारे शिकविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून संबंधित विषयाचे आकलन होणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना ते अधिक स्मरणात राहू शकतील. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संगणक देण्यात आले आहेत. संगणक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. काही शाळांमध्ये तर स्वतंत्र संगणक कक्ष उभारण्यात आले आहेत. खासगी शाळांमधून ई लर्निंग प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा वंचित राहू नयेत, यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ई लर्निंग उपक्रमासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. खासगी कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. लवकरच १२७ शाळांमधून ई लर्निंग प्रकल्पाचे कामकाज सुरू होणार आहे. शासनमान्य कंपनीकडून सॉफ्टवेअर असलेली हार्डडिस्क खरेदी केली जाणार असून, तिचे वितरण शाळांमध्ये केले जाणार आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये १५ हजार प्रश्नांचा संच उपलब्ध आहे. ई लर्निंगमुळे नियमित अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. शाळेमध्येच याची पूर्वतयारी होणार आहे. याशिवाय विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे ज्ञानही उपलब्ध होणार आहे.
ई लर्निंगमुळे गणितासारखा अवघड विषयही शिकवणे सुलभ होणार आहे. गणितासारख्या किचकट विषयातील चलतचित्राद्वारे विद्यार्थ्यांना गणिताचे सूत्र समजावले जाणार आहे. यासाठी शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई लर्निंगमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कालांतराने कमी होणार आहे. स्मार्ट फोनकडे विद्यार्थीवर्ग आकर्षित होत आहे. त्यामुळे ई लर्निंग पद्धतीने अभ्यासक्रमाच्या पद्धतीकडे विद्यार्थी आकृष्ट होत आहेत. या शिक्षण पध्दतीचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.