इको आणि लक्झरी बस अपघात, दहिसरमधील कुटुंबातील पाचजण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:29 PM2018-09-11T13:29:41+5:302018-09-11T14:14:43+5:30
पाचजण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिन्याच्या एका बाळाचा आणि तिच्या आईचाही समावेश आहे.
लांजा (रत्नागिरी) - मुंबई-गोवा महामार्गावर लांजानजीक कुवे येथे इको कार आणि खासगी आराम बस (लक्झरी) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने इको कारमधील पाचजण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिन्याच्या एका बाळाचा आणि तिच्या आईचाही समावेश आहे. कारमधील सर्वजण मुंबईकडून राजापूर तालुक्यातील कोंड्ये या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात होते. आज मंगळवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
प्रियांका काशीराम उपळकर (वय २९), पंकज हेमंत घाणेकर (वय १९), भार्गवी हनुमंत माजळकर (६ महिने), मानसी हनुमंत माजळकर (वय ३०) आणि एक अनोळखी पुरूष असे पाचजण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात मंगेश काशीराम उपळकर (वय २६), लहू काशीराम उपळकर (वय १८), अंकुश काशीराम उपळकर (वय १८), हनुमंत शंकर माजळकर (वय ३५), प्रमोद प्रभाकर माजळकर, आराम बस चालक नितीन शांताराम जाधव (वय ३४) हे या अपघातात जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दहिसर भागात राहणारे उपळकर व माजळकर कुटुंबीय गणेशोत्सवासाठी मुंबईहून राजापूरकडे येत होते. लांजानजीक कुवे येथे समोरून आलेल्या एका खासगी आराम बसशी इको कारची टक्कर झाली. त्यात इको कारचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे पाचजण जागीच ठार झाले. कारमधील अन्य सहाजण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाकडे हलवण्यात आले आहे.