शिवसेनेला अंतर्गत कुरबुरीचे ग्रहण!

By admin | Published: April 19, 2016 11:08 PM2016-04-19T23:08:02+5:302016-04-20T01:16:29+5:30

संगमेश्वर तालुका : आगामी निवडणुकांमध्ये विजयापासून रोखण्याचे स्वकियांचे तंत्र

The eclipse under the Shiv Sena! | शिवसेनेला अंतर्गत कुरबुरीचे ग्रहण!

शिवसेनेला अंतर्गत कुरबुरीचे ग्रहण!

Next

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेला उभारी मिळण्याऐवजी अंतर्गत कुरबुरीमुळे आगामी निवडणुकांमध्ये सेनेला विजयापासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र सेनेच्या गोटात दिसत आहे. नवे - जुने असा नवा वाद सेनेच्या घरामध्ये जोमाने सुरू झाला आहे. हा वाद मिटवण्यासाठी तसेच सर्वांना एकत्रित करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे, नाहीतर सेनेतील वाद सेनेत उभी फूट पाडण्यासाठी पोषक ठरतील.
संपूर्ण तालुका गेल्या अनेक वर्षांपासून सेनेशी बांधलेला आहे. येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्याबरोबरच आमदार, खासदार यांना मताधिक्य देण्याचे काम तालुका सदैव करीत असतो. सेनेच्या वरिष्ठांच्या आदेशाचा तालुक्यात नियमित सन्मान केला जातो. याचेच प्रतीक म्हणून तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये सेना अगे्रसर असते, किंबहुना महनीय पदांवर सेनेचाच कार्यकर्ता विराजमान होत असतो.
सेनेत अनेक वादळे आली. यात रवींद्र माने, सुभाष बने, प्रमोद कदम यांसारख्या ताकदीच्या नेत्यांनी सेनेला रामराम ठोकून सेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. तरीही निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात बळकट करत सर्व स्तरावर सत्ता टिकवून ठेवली. यामुळे सेना आणि तालुका असे समीकरणच बनले. सेनेला सोडून गेलेल्या नेत्यांनी ते ज्या पक्षात विराजमान झाले तो पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. तालुक्यात सेनेला कोणीही वारस नसताना कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनात्मक कामामुळे विरोधात दिग्गज नेते असतानाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुयश संपादन केले. ही किमया केवळ येथील तरूण व नवोदित कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कामाची होती. आजही सेनेचा गड म्हणून तालुक्याची ओळख आहे. आमदार व खासदारांना विजयासाठी आवश्यक मतदान याच तालुक्याने दिले. यामुळे या नेत्यांनी तालुक्याचे ऋण आपल्यावर असल्याचे जाहीरही केले आहे.
सेनेचे चांगले बस्तान बसलेले असताना सुभाष बने, प्रमोद कदम हे आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा सेनेत दाखल झाले. आता सेनेच्या चाललेल्या चांगल्या संसाराला नजर लागली. अनं सेनेत नवे - जुने असा वाद सुरू झाला आहे. सुभाष बनेंबरोबर आलेल्यांना जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती, पंचायत समिती उपसभापती अशी मानाची पदे देऊ करण्यात आली. यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाला. तालुक्यात सेना फु टीच्या उंबरठ्यावर आहे.
याची ठिणगी नुकत्याच झालेल्या तालुका सेनेच्या मेळाव्याप्रसंगी पडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय दळवी व युवा सेनेचा छोट्या गवाणकर यांनी आवाज उठवला. सेना तालुक्यात नवीन लोकांच्या हाती देऊन तेच कारभार चालवीत असल्याने नाराजी पसरली असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित नेत्यांनी सारवासारव केली. मात्र, या ठिणगीचा कोणत्याही क्षणी भडका उडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांची बांधणी सेनेकडून सुरू झाली आहे. यातही निष्ठावंतांना डावलून नव्याने सेनेत दाखल झालेल्यांना तिकिटे देण्याचे मनसुबे रचले जात आहेत. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता नाराज होऊ लागला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास तालुक्यात सेनेच्या फुटीची कक्षा रूंदावून मतभेद पाडापाडीच्या राजकरणाचा जन्म घेईल आणि हे सेनेच्या भवितव्यासाठी निश्चितपणे अपयशाची चाहुल देणारे आहे. (प्रतिनिधी)
तालुक्यात दौरे : भाजपने पाय पसरले
सेनेच्या नेत्यांनी तालुक्यातील सेना मजबूत करून तिकीट वाटपप्रसंगी निष्ठावंतांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. एकीकडे भाजपने तालुक्यात पाय पसरण्याचे काम सुरू केले आहे. सध्या भाजपच्या नेत्यांचे तालुका दौरे सुरू असून, हे दौरे सत्तेच्या जोरावर भविष्यात सेनेला डोके दुखी ठरू शकतात. याचसाठी सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आताच हालचाल सुरू करणे आवश्यक बनले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
जुने - नवे वाद...
संगमेश्वर तालुक्यातील सेनेत जुने - नवे वाद पुन्हा उफाळू लागला आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकांना बसणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: The eclipse under the Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.