शोभिवंत माशांची कोटी कोटी उड्डाणे

By admin | Published: April 22, 2016 11:27 PM2016-04-22T23:27:41+5:302016-04-23T00:25:28+5:30

वास्तूशास्त्रात महत्त्व : फ्लॉवर हॉर्न, रेड आरवाना माशांच्या किंमत लाखोंच्या घरात

Eco-Friendly Crores Crococo | शोभिवंत माशांची कोटी कोटी उड्डाणे

शोभिवंत माशांची कोटी कोटी उड्डाणे

Next

आकाश शिर्के-- रत्नागिरी --शोभिवंत माशांच्या मागणीत दिवसागणिक वाढ होत असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या माशांच्या व्यापारात कोट्यवधीची उलाढाल होत आहे. त्यात फ्लॉवर हॉर्न व रेड आरवाना हे मासे अतिशय महागडे असून, त्यांच्या किंमती लाखोंच्या घरात पोहचल्या आहेत. शोभिवंत मासे पाळणे, हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जात असून, चायनीज वास्तूशास्त्रात या माशांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
शोभिवंत माशांचा व्यवसाय वाढावा, या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे एनएफडीबी कृषी मंत्रालय व एमपीईडीए वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने विविध योजना राबवल्या जातात. त्यासाठी प्रकल्प उभारण्याकरिता २५ ते ५० टक्के अनुदान दिले जाते, जेणेकरून देशातील बेरोजगारांना या माध्यमातून रोजगाार प्राप्त होईल. त्याच उद्देशाने या माशांची जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी वाढून देशाला परकीय चलन मिळावे, या उद्देशाने योजना राबवल्या जातात.
शोभिवंत माशांचा व्यवसाय हा तांत्रिक विषयक असल्याने आता हा एक छंद राहिला नसून, तो एक व्यवसाय म्हणून भरभराटीला आहे. अनेक नवउद्योजक व तरुण पिढी या व्यवसायाकडे आकृष्ट झाली असल्याचे दिसत आहे. शोभिवंत मांशामध्ये फ्लॉवर हॉर्न व रेड अरवाना हे मासे चायनीज वास्तूशास्त्रानुसार लकी चार्म ठरले असून, या माशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे मासे सर्वांत जास्त महागडे असून, रेड आरवानाची किंमत १ लाखावर पोहोचली आहे. दरम्यान, आरवाना व फ्लॉवर हॉर्न हे मासे घरात असल्यास श्रीमंती येते, अशी धारणा असल्याने या माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.
शोभिवंत व गोड्या माशांमध्ये अनेक प्रकार असून, गुरामी व एन्जल या माशांना मागणी वाढत आहे.
रत्नागिरीत एन्जल या शोभिवंत माशांची पैदास केली जाते. डिस्कस या माशांची पैदास मुबई येथे केली जाते. डिस्कस हा मासा अत्यंत आकर्षक असून, जागतिक बाजारपेठेत जास्त परकीय चलन मिळवून देणारा शोभिवंत मासा आहे. त्यामध्ये एन्जल माशांचाही समावेश आहे.
सध्या शोभिवंत माशांमध्ये गप्पी, ब्लॅकमोली, स्वोर्ड टेल, गोल्ड फिश, फायटर, कोई कार्प, गुरामी या गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांची मागणी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात होते. त्यात गुरामी हा मासा अधिक महागडा असून, त्यातील काही दुर्मीळ जातीची मागणी वाढत आहे. शोभिवंत माशाच्या विक्री व्यवसायात जागतिक पातळीवर विचार केल्यास जवळपास पाच अब्ज डॉलरपर्यंत आर्थिक उलाढाल होते. ही उलाढाल प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मनोएन्जलला मागणी : कमी क्षारता पाण्यात मिळतात
शोभिवंत माशांमध्ये स्किपर, मनोएन्जल, आर्चर, आदी शोभिवंत मासे निमसागरी वातावरणात कमी क्षारता असलेल्या पाण्यामध्ये मिळतात. त्यात मनोएन्जल हा शोभिवंत व अतिशय आकर्षक असा मासा आहे. तो कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या माशाला अधिक मागणी असून, सध्या प्रत्येक घरात शोभिवंत मासे पाहायला मिळत आहेत.

Web Title: Eco-Friendly Crores Crococo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.