भाजीपाला शेतीतून आर्थिक उन्नती

By Admin | Published: January 18, 2016 12:50 AM2016-01-18T00:50:02+5:302016-01-18T00:50:31+5:30

काळसेतील शेतकरी अजित प्रभू : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झेंडू शेती

Economic advancement from vegetable farming | भाजीपाला शेतीतून आर्थिक उन्नती

भाजीपाला शेतीतून आर्थिक उन्नती

googlenewsNext

अमोल गोसावी -- चौके मालवण तालुक्यातील कृषिसमृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळसे गावातील तरूण अजित चंद्रकांत प्रभू (३५) याने दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर इतर तरूणांप्रमाणे मुंबईकडे धाव न घेता वडिलोपार्जित शेती सांभाळणेच पसंत केले. आईवडील करत असलेली पारंपरिक शेती करतानाच आर्थिक उन्नती मिळवून देणाऱ्या झेंडू शेतीकडे आपले लक्ष केंद्रीत केले आणि सन २०१३ पासून झेंडू शेतीमधून चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली.
झेंडू शेतीबरोबरच मुळा भाजी, लाल भाजी, मेथी, पालक, वाली, मका, कोथिंबीर, कलिंगड यांचीही शेती केली. या शेतीतून आर्थिक उन्नतीही प्राप्त केली. यावर्षी अनिल प्रभू यांनी अडीच गुंठ्यामध्ये कलकत्ता आॅरेंज जातीच्या २५० रोपांची लागवड केली असून, लागवड करताना गांडूळ खताचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे रोपांना गायीचे शेण, गोमूत्र, बेसन, गूळ, गांडूळ, पाणी यांच्यापासून बनवलेल्या खताचा वापर केला आहे. तसेच करपा रोगापासून संरक्षणासाठी काळ्या मिठाचाही वापर केला आहे. लागवडीपासून ५० दिवसानंतर तोडणी सुरू केली असून, आठवड्यातून दोन वेळा तोडणी ते करत आहेत. ही झेंडूची फुले ते कट्टा, मालवण, कुडाळ बाजारपेठेत सरासरी ४० रुपये किलोने विक्री करतात. ही तोडणी अडीच महिने सुरू राहणार असून, या झेंडू शेतीतून सुमारे २० ते २५ हजार निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. वर्षातून दोन वेळा अजित प्रभू झेंडूची शेती करतात. याबरोबरच भातशेतीमध्येही सुधारित नाविण्यपूर्ण श्री पद्धतीचा अवलंब करत गुंठ्याला ११० किलो भाताचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. झेंडू शेती करतानाच पाच गुंठ्यामध्ये भाजीपाल्याच्या लागवडीतून ४ ते ५ महिन्यांमध्ये सुमारे ५० हजार निव्वळ उत्पन्न प्रभू मिळवत आहेत.
वेगवेगळ्या शेतीतून वर्षाला सरासरी दीड लाखपर्यंत आर्थिक उत्पन्न अजित प्रभू मिळवत आहेत. अजित प्रभू सेंद्रीय शेतीवर अधिक भर देत असून, गोमूत्र फवारणी तसेच माश्यांपासून नत्र खत बनवून त्याचा शेतीसाठी वापर करतात.
अजित प्रभू यांच्या या यशात सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो त्यांचे आई-वडील व पत्नी यांचा. त्यांच्या सहकार्यामुळेचे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते, असे अजित यांनी सांगितले. कृषी सहाय्यक नानासाहेब पाटील, धनंजय गावडे, अभिजीत मदने, मालवण तालुका कृषी कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच शेतकरी मित्र राजू परब, प्रशांत खोत, कमलाकर गावडे, दीपक गावडे यांचेही मार्गदर्शन अजित परब यांना मिळते.
भविष्यात झेंडू शेतीत वाढ करण्याबरोबरच ब्रोकोली, ब्रेकेनी या विदेशी भाजीपाल्याची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्व शेती ही ठिंबक सिंचनावर करून १०० टक्के सेंद्रीय खतांचा वापर करण्याचा मानस अजित प्रभू यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरात एक तरी देशी गाय बाळगावी.

Web Title: Economic advancement from vegetable farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.