लोटे परिसरातील अर्थव्यवस्थेला कारखान्यांमुळे मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:24+5:302021-04-12T04:29:24+5:30
सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटेतील माळावर उभ्या राहिलेल्या कारखानदारीमुळे एका बाजूला लोकांच्या मनात असुरक्षितपणा निर्माण केला ...
सुनील आंब्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : लोटेतील माळावर उभ्या राहिलेल्या कारखानदारीमुळे एका बाजूला लोकांच्या मनात असुरक्षितपणा निर्माण केला असला, तरी याच कारखानदारीने लोटे परिसरात आर्थिक व्यवहारांना गती दिली आहे. अनेक कुटुंबांना या कारखान्यांमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वाढलेल्या बँका आणि पतसंस्था हे त्याचेच ठळक उदाहरण आहे.
खेड आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या या औद्योगिक वसाहतीत छोटे-मोठे असे १८० कारखाने असून, त्यातील १३० ते १५० कारखाने पूर्णांशाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये कायमस्वरूपी आणि ठेकेदारी असे मिळून जवळजवळ वीस हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. याखेरीज या कारखान्यांना गरजेच्या असलेल्या काही गोष्टींचा पुरवठा करण्याच्या माध्यमातूनही असंख्य लोकांना काम मिळाले आहे.
कारखाने सुरू होण्याआधी शेती, बागायती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. कोकणात बारमाही शेती, बागायती होत नाही. त्यामुळे यातून हंगामी स्वरूपाचेच उत्पन्न मिळते, तेही हवामानावर अवलंबून असलेले. त्यामुळे ते बेभरवशीच. मात्र, ज्यावेळी कारखाने सुरू झाले, तेव्हा हे चित्र बदलत गेले. शेती, बागायती नाही, म्हणून आधी जे अविकसित होते, त्यांना बंगला चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करता आले.
लोटे परिसरातील आर्थिक व्यवहारांना औद्योगिक वसाहतीमुळेच गतिमानता आल्याचेही नाकारता येणार नाही. त्यामुळेच राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्बन फाँका, विविध पतसंस्था यांची या भागातील संख्या वाढली आहे आणि त्यांची उलाढालही वाढतीच आहे.
औद्योगिकरणामुळे लोटेतील बाजारपेठेचे स्वरूपही गेल्या काही वर्षांत बदलले आहे. कारखानदारी येण्याआधी येथील शेतकऱ्यांना खरेदीसाठी खेड, चिपळूणचा पर्याय निवडावा लागत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत आता स्थानिक बाजारपेठेतच सर्वकाही उपलब्ध होत आहे. स्थानिक, तसेच परप्रांतीय लोकांची दुकाने वाढली आहेत.
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरून आलेले लोक आवाशी, असगणी, लवेल, लोटे, घाणेखुंट, पीरलोटे येथे राहतात. त्यामुळे त्यातूनही अनेकांना अर्थार्जनाचा मार्ग सापडला आहे.
या उद्योगांमुळे लोटे-धामणदेवी, आवाशी या ग्रामपंचायतींचा महसूल कोटीच्या घरात गेला आहे. या आधी केवळ माळरान असलेला परिसर आता लोखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे. हा पैसा थेट परिसरातील विकास कामांवरच खर्च होत आहे.
.........................
शैक्षणिक सुविधा
औद्योगिकरण वाढल्यानंतर या भागात शिक्षणाच्या सुविधाही वाढल्या आहेत. उच्च माध्यमिक शिक्षणासोबतच अभियांत्रिकी, तसेच वैद्यकीय महाविद्यालयही या भागात उभे राहिले आहे. ज्या घरडा कंपनीच्या स्फोटाची चर्चा अधिक होते. त्या कंपनीने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून या भागात खूप मोठी सुविधाही दिली आहे.
........................
वाहतूक व्यवसाय
कारखान्यांमध्ये तयार झालेला माल किंवा कच्चा माल आणण्यासाठी लागणाऱ्या वाहनांमुळे लोटेतील ट्रान्सपोर्ट व्यवसायही वाढला आहे. त्यामुळेच लोटे भागात ट्रान्सपोर्टची छोटी मोठी शंभर कार्यालये उभी राहिली आहेत. सर्व स्थानिक लोकच ती चालवत आहेत.