खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू, ग्राहक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:33+5:302021-04-26T04:28:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेली सहा महिने खाद्यतेलाच्या दरावर निर्बंध नसल्यामुळे दरामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. १५० ते ...

Edible oil prices continue to rise, consumers in crisis | खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू, ग्राहक संकटात

खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू, ग्राहक संकटात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेली सहा महिने खाद्यतेलाच्या दरावर निर्बंध नसल्यामुळे दरामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. १५० ते १८० रुपये लिटर दराने खाद्यतेल विक्री सुरू आहे. सूर्यफूल १५० ते १६० रुपये, तर शेंगदाणा तेल १८० रुपये लिटर दराने विक्री सुरू आहे. वाढत्या दरामुळे फोडणीही महागली आहे.

साखरेचे दर स्थिर असून, ३५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कडधान्य व डाळींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. हिरवा वाटाणा १२० रुपये, तर सफेद वाटाणा ८० रुपये किलो, चना डाळ ८० रुपये, मसूर ८० रुपये, चवळी १०० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. वाशी व कोल्हापूर येथून डाळी, कडधान्य, तेलाची आवक होत आहे. दीपावलीपासून दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. एक महिन्यावर पावसाळा आहे. पावसासाठी बेगमीचे साहित्य खरेदी करण्यात येते. मात्र, महागाईमुळे दैनंदिन खर्च भागविणे अवघड बनले आहे.

जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी येत असले तरी दरात मात्र कमालीची वाढ झाली आहे. ७० ते ८० रुपये किलोच्या घरात भाज्यांची विक्री सुरू आहे. कांदा मात्र १५ ते १८ रुपये किलो, तर बटाटा २५ रुपये किलो, तर पालेभाज्या २० ते २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

उष्मा वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कलिंगड, टरबुजासाठी विशेष मागणी होत आहे. २५ ते ३० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

फळांचा राजा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. ७०० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. आंब्याच्या वर्गवारीनुसार दर आकारले जात आहेत. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने दर अद्याप चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

खाद्यतेलाच्या दरातील वाढ दीपावलीपासून अद्याप सुरू आहे. वाढत्या दरामुळे फोडणी कशाची द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या दरावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

- कविता वाघ, गृहिणी

कोरोनामुळे लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्यांच्या अर्थार्जनावर झाला असतानाच, महागाईने कंबरडेच मोडले आहे. महागाईवर शासनाने नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.

- परिणिता माने, गृहिणी

Web Title: Edible oil prices continue to rise, consumers in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.