सर्वसामान्यांना शिक्षण महागले
By admin | Published: May 14, 2016 12:12 AM2016-05-14T00:12:36+5:302016-05-14T00:12:36+5:30
पालकांची धावपळ : शालोपयोगी साहित्यांच्या किंमती वाढल्या; शुल्कामध्येही वाढ
रत्नागिरी : शाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवधी असला तरी शालोपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी सुरू केली आहे. शैक्षणिक साहित्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. खासगी शिक्षण संस्थांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. काही शैक्षणिक संस्थांनी शुल्कामध्ये घसघशीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना शिक्षण महाग झाले आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी पालक शैक्षणिक साहित्याची खरेदी करत असत. मात्र, होणारी गर्दी व आयत्यावेळी होणारा पुस्तकांचा तुटवडा टाळण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर बहुतांश पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाली नसली तरी अन्य शैक्षणिक साहित्यात मात्र पाच टक्के वाढ झाली आहे.
नामवंत कंपन्यांच्या वह्यांना विशेष मागणी होत आहे. नवनीत, स्मार्ट, क्लासमेट कंपन्यांच्या वह्यांचा खप अधिक आहे. बहुतांश वह्यांचे पृष्ठ ब्राऊन कलरचे आहेत, तर काही वह्यांच्या पृष्ठांवर फुले अथवा प्राण्यांची चित्र दिसून येत आहेत.
कंपास बॉक्स, पाण्याची बाटली, टिफीन, आदी प्लास्टिक साहित्य, शालेय बॅग, स्केचपेन, रंगपेट्या, कव्हर्स, स्टीकर्स यांच्या किंमतीतही पाच टक्के वाढ झाली आहे. स्कूल बॅग, स्टीकर्समध्ये बेनटेन, बार्बी डॉल, अँग्रीबर्डबरोबर शायनिंग स्टिकर्सला विशेष मागणी होत आहे.
गतवर्षी इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रम बदलल्याने या वर्गाची पुस्तके उशिरा उपलब्ध झाली होती. यावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. पहिली ते पाचवीपर्यंतची सर्व विषयांची व माध्यमांची पुस्तके उपलब्ध आहेत. सहावीची पुस्तके बाजारात येण्यास उशीर आहे. मात्र, अन्य वर्गांची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सहावीची काही पुस्तके बाजारात येण्याची शक्यता आहे.
बहुतांश पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल आहे. शहरातील नामवंत शैक्षणिक संस्थांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. केजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकवर्ग शाळेत खेटे मारत आहेत. शाळा प्रवेश देण्यासाठी इमारत बांधकाम निधी म्हणून डोनेशन घेण्यात येते. २० ते २५ हजार रुपये पालकांकडून डोनेशन स्वरुपात घेण्यात येत आहेत.
प्रवेश मिळवण्यासाठी पालक डोनेशन देण्यास तयार होतात. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ यानुसार पालक गप्प आहेत. याशिवाय दरमहा आकारण्यात येणाऱ्या मासिक शैक्षणिक शुल्कामध्येही १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकूणच सर्व बाबींचा विचार केला असता, शैक्षणिक खर्चात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे यावर्षी पालकांचे शैक्षणिक ‘बजेट’ कोलमडणार आहे. परिणामी सर्वसामान्यांसाठी आता शिक्षण महागले असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
फी वाढवली
जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, यावर्षी शैक्षणिक संस्थांनी आपल्या फीमध्ये भरघोस वाढ केल्याचेही दिसत आहे. मासिक शैक्षणिक शुल्कामध्ये १०० ते २०० रूपयांची वाढ केल्याने पालकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. संस्थांनी डोनेशन फीदेखील वाढविल्याने प्रवेश घ्यायचा कसा, असा सवाल होत आहे. शैक्षणिक साहित्यांच्या किंमतींबरोबरच ही फी वाढविल्याने मुलांना शिक्षण देणे आता महाग पडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या बाजारात शंभर पानी मोठ्या आकारातील वह्या १९६ ते २१६ रुपये डझन, लहान आकारातील वह्या १९० ते २१६ रुपये डझन, दोनशे पानी मोठ्या वह्या २४५ ते ३२४ रुपये डझन, लहान वह्या २७० ते ४३२ रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. यामध्ये विविध चित्रांच्या वह्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
निकाल लागल्यापासून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकवर्ग बाजारात येत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गर्दीत वाढ होईल. यावर्षी इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने या वर्गाची पुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. सध्या छपाईचे काम सुरू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत शैक्षणिक साहित्याच्या किंमती बऱ्यापैकी स्थिर आहेत.
- गिरीश तावडे, ओमेगा स्टेशनरी, रत्नागिरी.