विक्षिप्त किरण निर्लज्जपणे बोलला, आपुननेच आई को मारा
By admin | Published: May 3, 2016 11:29 PM2016-05-03T23:29:08+5:302016-05-04T00:46:38+5:30
घडलेली घटना गंभीर असतानादेखील वडवलीवासीयांपैकी कोणीही तिथे फिरकले नाही. गावात खून झाला तरीही याबाबत कोणीही बोलायला तयार नव्हते.
आनंद त्रिपाठी -- वाटूळ --राजापूर तालुक्यातील वडवली येथील शिवनगरमध्ये पोटच्या मुलानेच चिव्याच्या बांबूचे प्रहार करुन जन्मदात्या आईचा निर्घृण खून केला. मोलमजुरी करून चरितार्थ चालवणारी आई आणि तिला शेजारी गावातच राहून मदत करणारी बहिण अशा गरिब कुटुंबात एका विक्षिप्त भावामुळे ही घटना घडली. हाच विक्षिप्त किरण एवढी घटना घडूनही सांगत होता की, आपुनने मारा आई को!’ शशिकला शशिकांत शिंदे (५५) या आपल्या मोठा मुलगा किरण शशिकांत शिंदे (२४) याच्याबरोबर राहात होत्या. ३ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. शशिकला या गावातच मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. शशिकला शिंदे यांना दोन मुलगे व एक मुलगी असून, लहान मुलगा मुंबई येथे आपल्या मावशीकडे राहातो. तर लग्न झालेली मुलगी ही गावातच भाड्याने राहात होती. वेळोवेळी बहीण रोहिणी ही आईला व भाऊ किरणलादेखील जेवण देत असे. किरण हा कोणताही कामधंदा करत नसल्याने वारंवार आई व त्याच्यामध्ये भांडणे होत होती. विक्षिप्त स्वभाव असलेल्या किरणची गावामध्ये देखील दहशत असल्याचे समजते. दिवसा तसेच रात्री-अपरात्री किरण हातामध्ये दंडुके घेऊन फिरत असे. घटनेच्या दिवशी शशिकला या रात्री दुसरीकडे थांबल्या होत्या. त्यानंतर सकाळी ७ वाजता त्या आपल्या घरी आल्या. यावेळी अंगण का झाडले नाही, अशी विचारणा किरणला केल्यानंतर किरणने हातामध्ये असलेला चिव्याचा बांबू घेऊन आईला मारहाण करायला सुरुवात केली.
दररोजचीच भांडणे असल्याने आवाज ऐकूनदेखील घटनास्थळी कोणीही शेजारी फिरकले नाहीत. कपाळाच्या मधोमध व डाव्या बाजूला बांबूचा फटका बसल्याने शशिकला शिंदे जागीच कोसळल्या. शेजारीच राहणाऱ्या विठोबा चव्हाण यांनी ही खबर पोलीसपाटलांना दिली. आईला मारहाण केल्यानंतर किरण वडवली बसस्थानकाजवळील सलूनमध्ये गेला. त्याठिकाणी दुकानात पाणी भरुन झाल्यानंतर काहीही घडले नाही अशा अविर्भावात पुन्हा घरी आला. मृतदेहाजवळ उभा राहून बिडी ओढत ‘आपूननेच आई को मारा’ असे बरळत उभा राहिला. पोलीस घटनास्थळी आले असता, किरण हा घरातील पडवीमध्येच होता व त्याने आपणच आईला मारल्याचे सांगितले. घटनास्थळाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक ओटवणेकर व पोलीस हवालदार तळेकर यांनी पंचनामा केला.
पंचनामा करताना साक्ष देण्यासाठी एकही शेजारी पुढे येत नव्हता. घडलेली घटना गंभीर असतानादेखील वडवलीवासीयांपैकी कोणीही तिथे फिरकले नाही. गावात खून झाला तरीही याबाबत कोणीही बोलायला तयार नव्हते.