उपलब्ध जलसाठ्यामधून मत्स्यउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : डॉ. प्रकाश शिंगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:16+5:302021-07-07T04:39:16+5:30
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयाने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान वापरून कोकणामधील उपलब्ध असलेल्या जलसाठ्यामधून मत्स्यउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत ...
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयाने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान वापरून कोकणामधील उपलब्ध असलेल्या जलसाठ्यामधून मत्स्यउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांनी मत्स्य महाविद्यालयातील विकसित पिंजरा मत्स्य संवर्धनाचे तंत्रज्ञान यावर लांजा तालुक्यातील झापडे येथील धरणावर आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरावेळी दिली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत लांजा तालुक्यातील झापडे धरणावर कृषी सप्ताहाचे औचित्य साधून आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मत्स्य महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, लांजा आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे शेतकऱ्यांना जलाशयामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ. प्रकाश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त एन. व्ही. भादुले यांच्या विशेष उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये, कृषिविज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद हनमंते यांनी के. वसंतराव नाईक यांचे जन्मदिनाचे महत्त्व विशद करून अन्नउत्पादन वाढीचे महत्त्व पटवून दिले.
मत्स्यसंवर्धन विभागाचे विभागप्रमुख डॉ. नाईक यांनी मत्स्य महाविद्यालयाला मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे, कोकणातील उपलब्ध असलेल्या जलाशयात लोकसमुदायातून मत्स्यसंवर्धन केले तर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून ग्रामीण जीवन उंचाविण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या जलाशयामध्ये पिंजऱ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी मत्स्यसंवर्धन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे, यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये, मत्स्य विद्याशाखेने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमास, लांजा पंचायत समितीचे कृषिविस्तार अधिकारी लोहार आणि कोंड्ये गावचे ग्रामसेवक राजेशिर्के उपस्थित होते. त्यांनी प्रकल्प राबविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रकल्पप्रमुख डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित शेतकऱ्यांना ‘जलाशयामध्ये पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. हरीश धमगाये, प्रा. महाले यांनी मेहनत घेतली. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सदावर्ते यांनी आभार मानले.