काेराेना काळात काम करणाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी प्रयत्न : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:32+5:302021-05-07T04:33:32+5:30
खेड : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये यापूर्वी देऊ केलेल्या मानधनापेक्षा ...
खेड : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये यापूर्वी देऊ केलेल्या मानधनापेक्षा अधिक मानधन जाहीर केले आहे. याकरिता निधीचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता सरकार घेणार आहे. तसेच कोरोना साथीच्या काळात जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मानधन तत्त्वावर काम करतील, त्यांना आगामी काळात राज्य सरकारमार्फत होणाऱ्या भरतीत प्राधान्यक्रम देण्याची मागणी कोकणातील सर्व आमदार राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी खेड येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारकडून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्राप्त झालेल्या ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीनचे वितरण करण्यासाठी उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दौरा सुरू केला आहे. यानिमित्ताने खेड येथे आलेल्या सामंत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. शिवसेनेने कोविडच्या साथीमध्ये ८० टक्के समाजकारणाचा पाया असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणातील आमदारांच्या सतत संपर्कात असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध केले आहेत.
जिल्ह्यातील मंडणगड, संगमेश्वर, पाली व रायपाटण येथे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना संभावित तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. त्यामध्ये जनतेने सरकारला साथ देणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये स्वतःच उपचार न घेता ताबडतोब रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. त्यामुळे मृत्यू दरात कमी येईल. लवकरच राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्समार्फत पॉझिटिव्ह रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर व ऑक्सिजनची आवश्यकता याविषयी पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या परीक्षांबाबत ते म्हणाले की, आपल्या विभागाच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून, काही ठिकाणी पदवीदान समारंभही पार पडला आहे.
यावेळी प्रांत अविशकुमार सोनोने, पोलीस निरीक्षक नीशा जाधव, गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे उपस्थित होते.
..........................................................
योगेश कदम यांच्यामुळे कोकणात १५० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर
माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे कोकणातील आमदारांच्या बैठकीत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केलेल्या मागणीमुळे कोकणातील तीन जिल्ह्यासाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी दहा काॅन्सन्ट्रेटर दापोली विधानसभा मतदारसंघात वितरित केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
.....................................
khed-photo65
खेड शहरातील सभापती निवास येथील पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.