अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना
By अरुण आडिवरेकर | Published: July 24, 2023 04:45 PM2023-07-24T16:45:53+5:302023-07-24T16:47:14+5:30
पोलिसांनी लक्ष घालून अंमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी
रत्नागिरी : अंमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.
एनसीओआरडी अर्थात अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक सोमवारी (२४ जुलै) घेण्यात आली. बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निरीक्षक जनार्दन परबकर, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक आयुक्त यादव गायकवाड, मत्स्योत्पादनाचे सहायक आयुक्त अभयसिंह इनामदार, जिल्हा बंदर अधिकारी वाय. आर. कुलकर्णी, चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक भातकर यांनी विषय वाचन करुन आढावा दिला. जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले की, पोलिस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अंमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अंमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीबाबत दक्ष रहावे. तशी माहिती मिळताच पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करावी. नशामुक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी आणि शाळा, महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी केली.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी ही जनजागृती व कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. या बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधीक्षक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.