संगमेश्वरातही लसीकरण सुरू करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:19+5:302021-05-03T04:25:19+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्याला १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात डावलल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच, काही क्षणात त्या वृत्ताची ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्याला १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात डावलल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच, काही क्षणात त्या वृत्ताची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी, या गोष्टीत आपण गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचे सांगितले. संगमेश्वर तालुक्यातही लसीकरण तातडीने सुरू होण्याबाबतीत हालचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी शनिवारी १ मे रोजी पाच तालुक्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात संगमेश्वर तालुक्याला डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. रत्नागिरी, राजापूर, गुहागर, चिपळूण, खेड अशा पाच तालुक्यात पहिल्या ६ दिवसांत प्रत्येकी २०० आणि सातव्या दिवशी ३०० असे प्रत्येकी १५०० लसींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र यात संगमेश्वर आणि इतर तीन तालुके का नाहीत, याचे उत्तर मिळालेले नाही. हे वृत्त समजताच आमदार निकम यांनी तातडीने लक्ष घातले. संगमेश्वर तालुक्यातील जनतेलाही लस मिळवून देण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.