Ratnagiri: सिलिंडर स्फोटात होत्याचं नव्हतं झालं; आई, बाबा, आजीशिवाय अम्मार-आरबाजला ईद ‘वेदनादायी’

By मेहरून नाकाडे | Published: April 22, 2023 05:21 PM2023-04-22T17:21:06+5:302023-04-22T17:43:25+5:30

स्फाेटामुळे छप्पर गमावलेल्या कुटुंबीयांना भाड्याच्या घरात ईद साजरी करण्याची वेळ

Eid without mother, father, grandmother painful, cylinder blast accident victims Eid in a rented house | Ratnagiri: सिलिंडर स्फोटात होत्याचं नव्हतं झालं; आई, बाबा, आजीशिवाय अम्मार-आरबाजला ईद ‘वेदनादायी’

Ratnagiri: सिलिंडर स्फोटात होत्याचं नव्हतं झालं; आई, बाबा, आजीशिवाय अम्मार-आरबाजला ईद ‘वेदनादायी’

googlenewsNext

मेहरुन नाकाडे

रत्नागिरी : सिलिंडरच्या गळतीने स्फाेट झाला आणि काही क्षणात हाेत्याचं नव्हतं झाले. काझी कुटुंबासह अन्य १५ कुटुंबीयांच्या डाेक्यावरचं छप्परच गेले. अम्मार व आरबाज या दाेन भावंडांनी तर या स्फाेटात आई, बाबा आणि आजीच गमावली. या स्फाेटामुळे छप्पर गमावलेल्या कुटुंबीयांना भाड्याच्या घरात ईद साजरी करण्याची वेळ आली आहे. तर अम्मार व आरबाज यांना आई-बाबा, आजीशिवाय सण वेदनादायी झाला आहे.

जानेवारी महिन्यात रत्नागिरी शहरातील शेट्येनगर येथील आशियाना इमारतीतील अश्फाक काझी यांच्या घरात पहाटे सिलिंडर गळती होऊन स्फोट झाला होता. या स्फोटात इमारतीचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली त्यांच्या पत्नी कनीज व सासू नुरुन्नीसा सापडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. अश्फाक गंभीर जखमी झाले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत मुलगा अम्मारही जखमी झाला होता. ताे आता बरा झाला असून, महाविद्यालयातही जाऊ लागला आहे. तर अरबाज मुंबईत नोकरीवर हजर झाला आहे.

दरवर्षी आरबाज रमजान ईदसाठी आई, बाबा, आजी, भावासाठी विशेष खरेदी करून रत्नागिरीत येत असे. त्यामुळे एकत्रित सणाचा आनंद वेगळा असे. यावर्षी आई, बाबा, आजीला गमावल्याचे दु:ख या भावंडांना अधिक आहे. त्यातही स्वत:चे घरही राहिलेले नाही. धाकटा भाऊ अम्मार मावशीकडे राहून शिक्षण घेत आहे. नातेवाईक धीर देत असले तरी रमजान ईदसारख्या मोठ्या सणाला आम्ही मात्र ‘पोरके’ आहोत ही वेदना असह्य होत असल्याचे आरबाज याने अश्रू गाळत सांगितले.

तीन महिने पालकमंत्र्यांचा आधार

सिलिंडर स्फोटामुळे इमारतीचे नुकसान झाले असून, इमारत कमकुवत बनली आहे. त्यामुळे चाळीतील १६ कुटुंबांना त्याचवेळी बाहेर काढण्यात आले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी सुरुवातीला तीन महिने या रहिवाशांना घरभाडे उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर मात्र रहिवासी स्वत: घरभाडे भरून राहत आहेत.

दुरुस्तीचा प्रश्न

सुरक्षेसाठी इमारत रिकामी करण्यात आली असली तरी इमारत दुरुस्तीचा प्रश्न आहे? त्यामुळे अजून किती महिने बाहेर रहावे लागणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. संबंधित रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

Web Title: Eid without mother, father, grandmother painful, cylinder blast accident victims Eid in a rented house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.