नवीन आठ रेल्वे स्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:10+5:302021-03-25T04:29:10+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून महिनाअखेर नवीन आठ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. दोन रेल्वे स्थानके कर्नाटक राज्यातील ...
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून महिनाअखेर नवीन आठ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. दोन रेल्वे स्थानके कर्नाटक राज्यातील असून उर्वरित सहा स्थानके कोकणातील आहेत. त्यात कळंबणी, कडवई, खारेपाटण आदींचा समावेश आहे. या नवीन क्रॉसिंग स्थानकांमुुळे अंतर कमी होऊन प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.
शिवकालीन गढी स्वच्छता
लांजा : तालुक्यातील साटवली येथील शिवकालीन गढीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. येथील शिवगंध प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या गढीवर आच्छादित असलेली झाडी, पालापाचोळा आदींची स्वच्छता करण्यात आली.
कलिंगडाला मागणी वाढली
देवरुख : सध्या तापमानाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्मा वाढू लागल्याने आता कलिंगडाला मागणी वाढली आहे. येथील बाजारात ग्रामीण भागातून टेम्पो भरून कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. कलिंगडाची आवक वाढल्याने त्याचा दरही निम्म्यावर आला आहे.
आरोग्य तपासणी
चिपळूण : शासनाच्या आदेशानुसार परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेला प्रारंभ झाला आहे. विविध प्रभागात शहरी कृती दलाच्या माध्यमातून शिमगोत्सव तसेच अन्य कारणांसाठी काही काळ वास्तव्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू झाला आहे. नगर परिषदेच्या नागरी आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
माकडाच्या पिलाची सुटका
दापोली : तालुक्यातील आडे येथे अन्न पाण्याच्या शोधात आलेल्या माकडिणीसोबत आलेले पिल्लू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले होते. मात्र, प्राणीमित्रांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या पिलाला जीवदान मिळाले. प्राणीमित्र मोनीत बाईत यांनी या पिलाची सुखरूप सुटका केली.
भाव घसरल्याने खरेदी वाढली
देवरुख : मध्यंतरीच्या काळात शंभरी ओलांडलेल्या कांद्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र, आता कांद्याचा दर २० ते २५ रुपयांवर घसरला आहे. ऐन शिमगोत्सवात कांदा स्वस्त झाल्याने खरेदी वाढली आहे. २० ते २५ रुपये किलो दराने मिळणारा कांदा खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
शिमगोत्सव रद्द
पावस : कसोप येथील श्री देव लक्ष्मीकेशवाच्या पालखीचा उत्सव साजरा करण्यात येणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या आदेशामुळे २७ मार्च रोजी होणारा हा उत्सव रद्द करण्यात आल्याचे श्रीदेव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ, कसोप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.