ऐंशी लाख लुटणाऱ्या दोघांना कऱ्हाडात अटक
By Admin | Published: March 27, 2016 10:32 PM2016-03-27T22:32:06+5:302016-03-28T00:28:47+5:30
सत्तावीस लाख जप्त : रत्नागिरीत झालेली लूटमार; तिसऱ्या आरोपीला अटक; दोघे मूळचे पाटण तालुक्यातील
कऱ्हाड/रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सोने-चांदी व्यापाऱ्याच्या दोन कामगारांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐंशी लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कऱ्हाडनजीकच्या ढेबेवाडी फाट्यावर रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. लुटमारीचा गुन्हा रत्नागिरीत घडल्याने संबंधित आरोपींना रत्नागिरी शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अनिल राजाराम वंडूसकर (३०, कोपरखैरने, ठाणे, मूळ कुंभारगाव, शिबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा ) व मच्छींद्र मारुती कामथे (३०, हरिकृपा चाळ, मानपाडा गाव, डोंबिवली पूर्व, मूळ रा. खळद, चौहाण वस्ती, ता. पुरंदर. जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अमित शिवाजी शिबे (२२, नेरुळ, नवी मुंबई, मूळ रा. कुंभारगाव शिबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ येथील सोने व्यापारी जितेंद्र हिंदुराव पवार व बाबासाहेब विठ्ठल सरगर यांचे कामगार श्रीराम शेडगे व विकास शिंदे हे दोघेजण २१ मार्च २०१६ रोजी
मुंबई झवेरी बाजार येथे सोने विकण्यासाठी गेले होते. त्या दोघांच्याजवळ दोन किलो वजनाची सोन्याची लगड होती. हे सोने विकून त्यातून मिळालेले ६० लाख व पुढील व्यवहारासाठी आगावू मिळालेले २० लाख असे ८० लाख रुपये घेऊन ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेसने केरळला परत जात होते. हे दोघेही एस ७ या बोगीत बसले होते.
२२ मार्चला पहाटे ते रत्नागिरी स्थानकात ३.३० वाजता आले असता त्याच गाडीने त्यांच्यावर पाळत ठेवत प्रवास करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या बोगीत प्रवेश केला. त्यांना आम्ही पोलीस आहोत, तुम्ही जनरल बोगीचे तिकिट काढलेले
असताना आरक्षित बोगीत कसे बसलात, असे विचारत
आमच्यासोबत साहेबांकडे चला, असे सांगून त्यांना रेल्वेस्थानकाबाहेर घेऊन आले. त्यानंतर पायी चालत मुख्य रस्त्यावर आले. त्याठिकाणी आधीच तयारीत असलेल्या स्वीफ्ट डिझायर (एम एच १२ केएन १२९१) मध्ये त्यांना बसविले. संगमेश्वरच्या दिशेने जात त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्याकडील ८० लाख तसेच साक्षीदार शेडगे व शिंदे यांच्या खिशातील रोख रक्कम ४२०० रुपये, ४ मोबाईल असा आणखी १० हजार २०० रुपयांचा ऐवज त्यांनी ताब्यात घेतला. रस्त्यावर अंधारातच त्यांना गाडीतून ढकलून दिले.
याप्रकरणी जितेंद्र पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात २३ मार्चला तक्रार दाखल केली होती.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, शनिवारी रत्नागिरीच्या लूटमार प्रकरणातील आरोपी कऱ्हाडनजीकच्या ढेबेवाडी फाट्यावर आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांना माहिती देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक निरीक्षक काकंडकी, सहायक फौजदार ए. पी. पवार, हवालदार दिलीप क्षीरसागर, पी. के. कदम, प्रमोद पवार, राजू पाटोळे, शरद माने, अमोल पवार, राजू कोळी, संजय काटे, वैभव डांगरे, सुधीर जाधव यांचे पथक तपासासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत आरोपी या पथकाला सापडले नव्हते. अखेर पहाटे रात्रगस्त घालत असताना ढेबेवाडी फाट्यानजीक एक कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे सहायक निरीक्षक काकंडकी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यासह पथकाने गाडीला घेराव घालून कारमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील २६ लाख ७९ हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली. दोन्ही आरोपींना रविवारी रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
‘बी. आर.’ यांना बक्षीस
या कारवाईत सहभागी रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील व कऱ्हाडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना प्रत्येकी १० हजारांचे बक्षीस (रिवार्ड) दिले जाणार आहे. तसेच उपनिरीक्षक रवीराज फडणीस व मामा कदम यांना प्रत्येकी ५ हजार, अन्य कर्मचाऱ्यांना २ हजार याप्रमाणे बक्षीस दिले जाणार असल्याचे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
आरोपींमध्ये पैशाची वाटणी!
रत्नागिरीत कामगारांना लुटणाऱ्यांपैकी दोघांना कऱ्हाडात अटक करण्यात आली. मात्र, त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. या सर्वांनी लूटमार केल्यानंतर एका ठिकाणी थांबून पैशाची वाटणी केली होती. त्यानंतर प्रत्येकजण आपापला हिस्सा घेऊन तेथून स्वतंत्रपणे निघून गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेले दोघेजण कार घेऊन मुंबईला निघाले होते. मात्र, तत्पूर्वी ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
७० लाखांसह वाहनही जप्त: पोलीस अधीक्षक संजय शिंदे
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ओखा एक्स्प्रेसमधील दोघांकडून ८० लाख १० हजार २०० रुपयांची लूट केल्याच्या प्रकरणाचा रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून, ६९ लाख ९७ हजार ५०० रुपये रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट डिझायर गाडीही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून एक वा त्यापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध सुरू आहे. या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.