निवडणूक अर्जही आॅनलाईन
By admin | Published: December 2, 2014 10:43 PM2014-12-02T22:43:04+5:302014-12-02T23:30:28+5:30
शक्तीप्रदर्शनाच्या उधाणाला निवडणूक आयोगाचा चाप
रत्नागिरी : निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरणे अनिवार्य केले असून, आता उमेदवार अगदी घरबसल्या आपला अर्ज आॅनलाईन भरणार आहेत. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे शक्तीप्रदर्शनालाही चाप बसणार आहे.
आता अगदी ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकाही प्रतिष्ठेच्या केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीसाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करूनच अर्ज भरला जात असे. मात्र, आता निवडणूक आयोगाने शक्तीप्रदर्शनाला चाप लावला आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला आपला अर्ज आॅनलाईन सादर करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे त्याचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी अर्जदारांकडून कशा प्रकारे अर्ज आॅनलाईन भरून घेणे अपेक्षित आहे, हे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २३ रोजी निवडणुका होत आहेत. त्यासाठी ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरावे लागणार असल्याने या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता महा-ई सेवा केंद्रात अर्ज भरावा लागणार आहे किंवा निवडणुका असलेल्या दापोली, खेड आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांतील पंचायत समितीमध्ये त्यांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र, आयोगाने ग्रामस्तरावरूनच आॅनलाईन अर्ज अनिवार्य केल्याने शक्तीप्रदर्शनात होणाऱ्या खर्चावरही आता नियंत्रण येणार आहे. (प्रतिनिधी)