रत्नागिरी नगरपरिषदेची विषय समितींची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:49 PM2018-12-27T18:49:27+5:302018-12-27T18:51:04+5:30
रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समितींच्या सभापतींची निवडणूक गुरूवारी पार पडली. जास्त संख्याबळ असलेल्या शिवसेनेने बिनविरोध विजय मिळविला.
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समितींच्या सभापतींची निवडणूक गुरूवारी पार पडली. जास्त संख्याबळ असलेल्या शिवसेनेने बिनविरोध विजय मिळविला.
नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची मुदत संपल्यामुळे गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. दुपारी १२ वाजता सभापतीपदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले. प्रत्येक सभापतीपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले. रत्नागिरी नगरपरिषदेत ३० पैकी शिवसेनेचे १७ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडून एकही अर्ज़ भरला गेला नाही.
बांधकाम सभापतीपदी वैभवी खेडेकर, महिला आणि बालकल्याण मीरा पिलणकर, उपसभापती अस्मिता चवंडे, सभापतीपदी पाणी सभापतीपदी सुहेल मुकादम, नियोजन सभापतीपदी राकेश नागवेकर, आरोग्य आणि स्वच्छता सभापती संतोष कीर आणि स्थायी समिती सदस्य राजन शेट्ये, मधुकर घोसाळे यांची बिनविरोध निवड झाली.
विजयानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.