चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू; १५ जानेवारीला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 03:34 PM2022-12-24T15:34:49+5:302022-12-24T15:35:19+5:30

ग्रामपंचायत निवडणूक संपताच आता मात्र पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू

Election process of Chiplun Urban Bank begins; Voting on 15 January | चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू; १५ जानेवारीला मतदान

चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू; १५ जानेवारीला मतदान

Next

चिपळूण : येथील चिपळूण अर्बन बँकेची स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नवीन कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १७ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकूण १५ जागांसाठी यापूर्वीच ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ३ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

चिपळूणमधील सर्वात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक ठरलेल्या चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी १७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक स्थगित ठेवण्यात आली हाेती. ग्रामपंचायत निवडणूक संपताच आता मात्र पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अर्बन बँकेत एकूण १५ संचालक निवडून द्यायचे असून, त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून ९, तालुक्याबाहेरील सर्वसाधारण मतदार संघातून १ तसेच महिला प्रतिनिधी मतदार संघातून २, अनुसूचित जाती-जमाती १, इतर मागास वर्गातून १ आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघातून १ असे संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी महिला प्रतिनिधी मतदारसंघात दोनच इच्छुक महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१३ जागांसाठी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर ४ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, याचदिवशी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे २४ हजार ९०० मतदार मतदान करणार आहेत.

या निवडणुकीसाठी अद्याप कोणतेही पॅनल जाहीर झालेले नाही. सर्वांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तसेच बहुतांश विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहकार पॅनलची घोषणा होऊन विद्यमान संचालकांनाच संधी दिली जाणार की, काही विद्यमान संचालकांना थांबवून नवीन चेहऱ्यांना सहकार पॅनलमध्ये सहभागी करून घेतले जाणार, याकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Election process of Chiplun Urban Bank begins; Voting on 15 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.