४७२ ग्रामपंचायतींच्या १४८४ प्रभागांत होणार निवडणुका
By admin | Published: February 10, 2015 11:09 PM2015-02-10T23:09:01+5:302015-02-10T23:50:36+5:30
रत्नागिरी जिल्हा : ३८६६ जागांसाठी होणार लढत, राजकीय स्तरावर दखल
रत्नागिरी : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींच्या एकूण १,४८४ प्रभागातील ३,८६६ जागांसाठी येत्या एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षही तयारीला लागले आहेत.जिल्ह्यात एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी काहींच्या पोटनिवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. या ४७२ ग्रामपंचायतींच्या एकूण १४८४ प्रभागातील ३,८६६ सदस्यांच्या जागांसाठी या निवडणुका होणार आहेत.निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना प्रशासकीय यंत्रणेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या त्या गावांमध्येही निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. यासाठी आरक्षणही निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अनुषंगाने आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन, त्या हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. १३ रोजी अंतिम प्रभाग रचना, आरक्षित जागांचा तपशील प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)