कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल, आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
By शोभना कांबळे | Published: September 15, 2023 06:54 PM2023-09-15T18:54:05+5:302023-09-15T18:54:23+5:30
गतवेळी १६,२२२ मतदारांची नोंदणी झाली होती
रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने आता २०२४ साली होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यामुळे आता मुदत संपत आल्याने त्यापूर्वी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या याद्या अद्यावत करतानाच पदवीधर नवीन मतदारांना नाव नोंदविता येणार आहे. त्यासाठी १८ क्रमांकाचा फाॅर्म भरून मतदार नाव नोंदवू शकतात. यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना आपले नाव कोकण पदवीधर मतदार यादीत नोंदविता येणार आहे.
मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावरील सुनावणीनंतर ३० डिसेंबर २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त निवडणूक अधिकारी तर जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
गतवेळी या निवडणुकीसाठी १६,२२२ मतदारांची नोंदणी झाली होती. तसेच निवडणुकीसाठी २६ मतदान केंद्र होती. यावेळीही सुमारे १६ हजार मतदारांची नोंदणी होईल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केला. त्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडे ५० हजार अर्जांची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.