काेकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:54+5:302021-04-02T04:32:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.
रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ सेफ्टी) मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्यात येते. मध्य रेल्वेचे हे सुरक्षा पथक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले. रोहा येथून सात डब्यांची गाडी डिझेल इंजिन लावून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आणली गेली. रत्नागिरीतून ती दुपारी ३ वाजता विजेवर चालवत रोह्याकडे रवाना झाली. यामध्ये इलेक्ट्रिक विभागासह सुरक्षा पथकातील तज्ज्ञ अधिकारी सहभागी झाले आहेत. गाडी रोह्याला पोहोचल्यानंतर सीआरएस पथकाचा अहवाल कोकण रेल्वेला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने १,१०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रत्नागिरी ते रोहा या २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८मध्ये आरंभ झाला. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल, पूल येथून वीजवाहिन्या, विद्युत खांब उभारले आहेत. वाहिन्यांमधून करंट सोडण्याची चाचणी २२ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर आता सीआरएस तपासणी केल्यामुळे प्रत्यक्षात वाहतूक सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चाैकट
पहिली मालगाडी धावणार
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महिनाभरात विजेवर गाड्या सुरु होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु असून, आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पहिली मालगाडी चालविण्यात येणार आहे.