दापाेलीतील भडवळे गावात वीजचाेरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:52+5:302021-05-15T04:30:52+5:30
दापोली : तालुक्यातील भडवळे गावात रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावरून विनापरवाना वीजजोडणी घेतल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या वीजखांबावरून दुकान व ...
दापोली : तालुक्यातील भडवळे गावात रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावरून विनापरवाना वीजजोडणी घेतल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या वीजखांबावरून दुकान व चिकन सेंटरमध्ये वीज घेण्यात आली हाेती. दापाेलीतील मनोज पवार यांनी हा प्रकार उघडकीला आणला असून, महावितरणकडून दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
भडवळे गावामध्ये वीजचोरी होत असल्याची माहिती मनोज पवार यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली. त्यांनी याबाबत महावितरणच्या देगाव येथे कार्यालयाशी संपर्क साधला. येथील कनिष्ठ अभियंता आर.व्ही. वाघ यांनी त्यांचे सहाय्यक राजेश महाडिक यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी पोलीसपाटील दिलावर बामणे व सरपंच विजय नाचरे यांच्यासोबत जाऊन पाहणी केली. भडवळे ऊसवाडी येथील दुकानात विनापरवाना वीजजोडणी घेतल्याचे आढळले.
या विजेचा वापर दुकानामध्ये लाइट, पंखे, दुकानांमधील वजन काटा, फ्रीज, डीपफ्रीज व दुकानालगत असलेल्या चिकन सेंटरसाठी वापरत होता. कनिष्ठ अभियंता आर.व्ही. वाघ यांनी पोलीसपाटील व सरपंच यांच्यासह पंचनामा केला तसेच याचा अहवाल व शूटिंग वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले. वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. हा दंड भरला नाही तर त्यांच्यावर दापोली पोलीस स्थानकात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता आर.व्ही. वाघ यांनी दिली.