सुमारे 13 लाखांची वीज चोरी, खेडमधील तळघर येथील प्रकार
By संदीप बांद्रे | Published: May 27, 2024 10:26 PM2024-05-27T22:26:01+5:302024-05-27T22:26:14+5:30
चिपळूण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल
संदीप बांद्रे / चिपळूण- गेल्या पंधरा महिन्यांपासून 76 हजार 93 युनिट्स चा वापर करत महावितरणचे 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील तळघर येथे घडला आहे. याप्रकरणी रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार या दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात महावितरणच्या पेण येथील भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली. लोटे एमआयडीसी उपविभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या आख्यारीत येणाऱ्या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धरमसारे तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशीकुमार तांबे ,वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार यांचा ग्राहक क्रमांक 22 23 60 00 20 58 या चिरेखानीच्या वीजपुरवठा असलेल्या विज संचाची तपासणी केली. यामध्ये या मीटर मधून वापरत असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी सदर वीज मीटर हाताळलेला पाहायला मिळाला.
या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू ढिले करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करत असल्याचे आढळून आले. जेणेकरून वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये नोंद होणार नाही अशा प्रकारे वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याचे दिसून आल्यानंतर राकेश रामचंद्र बुदार यांनी पोटेन्शिअल टर्मिनलचे स्क्रू ढिले करून व केबल हलवून मीटर चालू बंद करत असल्याचे मान्य केले. तसे प्रत्यक्षित सुद्धा त्यांनी पथकासमोर करून दाखवला. अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्या विजग्राहक रामचंद्र बाबूजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार त्याच्या वीज मीटरच्या साह्याने वीज चोरी करत होते. ते वीज मीटर पंचांच्या समक्ष सील करून ताब्यात घेतले गेले.
अनधिकृतपणे विजेचा वापर गेल्या पंधरा महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी 2023 ते मार्च 2024 या कालावधीत झाला असून 76 हजार 93 युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे. तब्बल 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले. त्यानुसार वीज अधिनियम कायदा 2003 सुधारित कायदा 2007 चे कलम 135 अन्वये रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार यांच्या वरती दिलेल्या चोरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास चिपळूण पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करत आहेत.