शहरी, ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया आता महाविद्यालयीन स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:36 AM2021-08-14T04:36:36+5:302021-08-14T04:36:36+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित करून दहावीच्या गुणांवरून ...
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित करून दहावीच्या गुणांवरून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये महाविद्यालयीन स्तरावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शहरातील काही महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात तर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मात्र केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी परीक्षा अचानक रद्द केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
क्षमतेपेक्षा विद्यार्थी संख्या कमी
जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. या प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार ८० इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही ६,३४० जागा शिल्लक राहणार असून, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे. जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१, विनाअनुदानित ५१, स्वयंअर्थसहाय्यितची २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतून कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला अडचण निर्माण होणार नाही
ऐनवेळेला परीक्षा रद्द करून नुकसान
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर शासनाने सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित केल्यामुळे यासाठी घेतलेले परिश्रम वाया गेले आहेत. सीईटीच्या तणावामुळे उत्तीर्ण झाल्याचा आनंदही घेता आला नाही. परीक्षा रद्द केल्याने ताण मात्र कमी झाला आहे.
- हिना काझी, रत्नागिरी
शासनाने गेल्या आठवड्यात सीईटी परीक्षा रद्दची घोषणा केली. या परीक्षेसाठी मार्गदर्शन लावले होते, अभ्यासासाठी पुस्तके खरेदी केली होती. मात्र, परीक्षा रद्द केल्याने आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय दोन ते अडीच महिने परीक्षेचे टेन्शनच अधिक होते. परीक्षेसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. परीक्षा रद्दचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता.
- रिया खेडेकर, जाकादेवी
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून, शासन आदेशानुसार जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून पुढील सूचनेनुसार महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज सुरू करण्यात येणार आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.