अकरावी प्रवेश होणार सुरळीत, जागा राहणार शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:56 PM2020-08-01T18:56:08+5:302020-08-01T18:56:55+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २२ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यापैकी २२ हजार ५०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २२ हजार २११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कोकण मंडळाचा एकूण निकाल ९८.६९ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.
या प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनदेखील ५ हजार २०९ जागा शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१ असून, त्यामध्ये कला शाखेसाठी ३ हजार ५६०, विज्ञान शाखेसाठी २ हजार ४८०, वाणिज्य शाखेसाठी २ हजार ८०, संयुक्तकरिता १ हजार ८४० मिळून एकूण ९ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे.
विनाअनुदानित ५१ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यामध्ये कला शाखेसाठी २ हजार ९२०, विज्ञान शाखेमध्ये ४ हजार ८०, वाणिज्य शाखेमध्ये ५ हजार २४०, संयुक्तची १ हजार ४०० मिळून एकूण १३ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे.
स्वयंअर्थ सहाय्यितची एकूण २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये कला शाखेत ८८०, विज्ञान शाखेत १ हजार १२०, वाणिज्य शाखेत १ हजार ४०, संयुक्तमध्ये ७८० मिळून एकूण ३ हजार ८२० इतकी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात कला शाखेची एकूण ७ हजार ३६०, विज्ञान शाखेची ७ हजार ६८०, वाणिज्य शाखेची ८ हजार ३६०, संयुक्तची ४ हजार २० इतकी प्रवेश क्षमता आहे.
मात्र, विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसाठी प्रवेशाची यादी वाढते. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाची संख्या आणखी कमी होणार आहे.
संयुक्त विभागाच्या मात्रा ६४० जागा वाढल्या
चार वर्षांपूर्वी (२०१६)मध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असतानाही एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला नव्हता. तीन वर्षांपूर्वी १४० महाविद्यालये होती. कला शाखेमध्ये ७ हजार ६००, विज्ञान शाखेत ७ हजार ४४०, वाणिज्यमध्ये ८ हजार ८४०, संयुक्तमध्ये ३ हजार ४८० प्रवेश क्षमता होती. कला व विज्ञान शाखेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी वाणिज्यच्या जागा स्थिर आहेत. संयुक्त विभागाच्या मात्र ६४० जागा वाढल्या आहेत.
शाखानिहाय फरक रद्द
सध्याचा ५+२+३ हा पॅटर्न रद्द करून उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे. यामध्ये नववी ते बारावी एकत्र करून चार वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखानिहाय फरक रद्द केला असून, एकूण आठ सेमिस्टरचा अभ्यासक्रम राहणार आहे.
ज्यामध्ये भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येणार आहेत. एकूणच विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौध्दीक विचार करूनच हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असला, तरी याबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल
व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाकडे विद्यार्थी प्रवेश घेतात. अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरातील महाविद्यालयांमध्ये जातात. ग्रामीण भागात शाळेशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांपेक्षा शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच विज्ञान, वाणिज्य शाखेकडे प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करतात.
आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पालक, विद्यार्थ्यांचा आग्रह असल्यामुळेच प्रवेश प्रक्रिया जटील बनते. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जात असला, तरी काही प्रवेश राखीव ठेवले जातात. संस्थाचालकांच्या संमत्तीने प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीबरोबरच पैसेही मोजले जातात.